सांगली- कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ कायम असून पाणीपातळी सध्या 33 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे शहरातल्या सखल भागात पाणी शिरू लागले आहे. त्यामुळे जवळपास 30 हून अधिक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे. तर पाण्याची वाढती पातळी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन एनडीआरएफ पथकांना पाचारण केले आहे.
कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. रविवारपासून ही वाढ पुन्हा होऊन पाणी पातळी 33 फुटांवर पोहोचली आहे. कोयना धरणातून सध्याच्या घडीला 53 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्या ठिकाणी सध्या पावसाचा जोर मंदावला आहे, असे जरी असले तरी कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी अधिक प्रमाणात सुरुच आहे.