सांगली- छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचे तातडीने निर्माण करावे, अशी मागणी रामोशी समाज आणि वंचित बहुजन आघाडीने केली आहे. तसेच सरकारने याबाबत तत्काळ भूमिका घ्यावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. खानापूरच्या बानुरगड येथे आयोजित शौर्य अभिवादन सोहळ्यात ही मागणी करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात रामोशी समाजातील बहिर्जी नाईक हे गुप्तहेर म्हणून कार्यरत होते. शत्रूंच्या राज्यातील छावण्यांमध्ये वेगवेगळे वेशांतर करत बहिर्जी नाईक हे शत्रूंची गुप्त महिती काढुन छत्रपतीपर्यंत पोहोचवत होते. अशाच एका कामगिरी दरम्यान शत्रूंच्या हल्ल्यात बानुरगड येथे बहिर्जी नाईक हे धारातीर्थ पडले. त्यानंतर याच गडावर बहिर्जी नाईक यांची समाधी बांधण्यात आली.
सांगलीच्या खानापूर तालुक्यातील बानूरगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यदलातील गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची समाधी आहे. मात्र, नाईक यांची समाधी आजही दुर्लक्षित आहे. दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त समस्त रामोशी समाज बहिर्जी नाईक यांना अभिवादन करण्यासाठी बानुरगडावर जमा होतो.
बहिर्जी नाईकांच्या स्मारकाची मागणी बहिर्जी नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या पराक्रमाला अभिवादन करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून अखिल भारतीय बेडर, बेरड रामोशी समाज कृती समिती व एम.एम.ग्रुप यांच्या वतीने अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो रामोशी बांधव बानुरगडावर उपस्थिती लावतात. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षीही बानुरगडावर रविवारी मोठ्या उत्साहात हा अभिवादन सोहळा पार पडला. यानिमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदभाऊ लाड, अखिल भारतीय बेडर, बेरड रामोशी समाज कृती समितीचे अध्यक्ष मोहनराव मदने यांच्यासह बहिर्जी नाईक यांचे वंशज व रामोशी समाजातील नेते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोपीचंद पडळकर म्हणाले, दुर्लक्षित असणाऱ्या आणि गेल्या कित्येक वर्षांपासून न्यायहक्कासाठी लढणाऱ्या रामोशी समाजाने मुख्य प्रवाहात येण्यासाठी शैक्षणिक वाटचाल अधिक गतीने धरली पाहिजे. तसेच रामोशी समाजाने आता राजकीय भूमिका घेणे गरजेचे असल्याचे मत पडळकर यांनी व्यक्त केलं तसेच बानुरगड याठिकाणी राज्य सरकारकडून तातडीने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी स्मारक उभा करण्याबाबतची भूमिका जाहीर केली पाहिजे, अशी मागणी केली. तसेच प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही पडळकर यांनी दिला आहे.
तर भाजप सरकारविरोधात भूमिका घेऊ -
यावेळी समस्त रामोशी समाज बांधवांना ऊर्जा आणि प्रेरणा देणाऱ्या बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाबाबत सरकारने त्वरित भूमिका जाहीर करावी, अन्यथा सरकार विरोधात आंदोलन छेडू असा आक्रमक पवित्रा जाहीर केला. तसेच सरकारने याची दाखल न घेतल्यास भाजप सरकार विरोधात राजकीय भूमिका घेण्याचा इशाराही यावेळी अखिल भारतीय बेडर, बेरड रामोशी समाज कृती समितीचे अध्यक्ष मोहनराव मदने यांनी दिला आहे.