सांगली- सांगली लोकसभेच्या काँग्रेस आघाडीतील तिढयाबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आज सांयकाळी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. आज संध्याकाळी ५ वाजता सांगलीमध्ये राजू शेट्टी पत्रकार परिषद घेणार असून सांगलीची जागा काँग्रेसला सोडणार की लढवणार, याबाबत स्षटीकरण देणार आहेत. तसेच काँग्रेसमधून बंडखोरीचा इशारा दिलेल्या विशाल पाटलांना संधी देणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
काँग्रेस आघाडीतील सांगलीच्या लोकसभेच्या जागेचा तिढा अद्याप कायम आहे. सुरुवातीला या ठिकाणी काँग्रेसमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास कोणीही इच्छुक नसल्याने, मित्र पक्ष असणाऱ्या स्वाभिमान शेतकरी संघटनेला ही जागा देण्याचा निर्णय काँग्रेस वरीष्ठ पातळीवर घेण्यात आला होता. यावरून सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये जोरदार वादळ उठले आहे. मागील ३५ वर्षांपासून वसंतदादा घराण्याचे सांगली लोकसभा मतदारसंघावर प्रभुत्व राहिले आहे. आता या निवडणुकीमध्ये वसंतदादाच्या घराण्याला डावलण्यात येत असल्याचा आरोप करत, वसंतदादा गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस भवनला टाळे ठोकून रविवारीपासून वसंतदादा गटाने आक्रमक पवित्रा घेत सांगली लोकसभेची जागा काँग्रेसकडे राहिली पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली आहे.