सांगली -राष्ट्रवादीचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या परिक्रमा आंदोलनावर प्रश्न उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना 2019 प्रमाणे अधिकची मदत देण्याचा निर्णय 27 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला असताना आंदोलन, परिक्रमा करण्याची आवश्यकता नव्हती, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ते सांगली मध्ये बोलत होते.
'राजू शेट्टींची आम्हाला गरज' -
राजू शेट्टी यांनी जलसमाधी घेऊ नये, त्यांची आम्हाला गरज आहे, त्यांनी टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही, असे मत मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. तसेच शेतकऱ्यांना अधिकची मदत देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कोणीही चिंता करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी चिंता करू नये, महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा -पेंग्विनवर 3 वर्षांत 15 कोटींचा खर्च, निविदा रद्द करण्याची विरोधी पक्ष नेत्यांची मागणी
'सत्याग्रह पाहून सरकार हादरले' -
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पंचगंगा परिक्रमा आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी स्वाभिमानीचे आंदोलक शेतकरी आणि राजू शेट्टी यांनी कृष्णेच्या पाण्यात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, ही यात्रा रविवारी नरसिंह वाडी येथे पोहोचेली. पूरग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांचा सत्याग्रह आहे. सत्याचा आग्रह धरत शेवटपर्यंत लढत राहणे हे शेतकऱ्याचे काम आहे. सत्याचा आग्रह केला की सत्याचाच विजय होतो. म्हणून आंदोलनाची व्याप्ती पाहून सरकार हादरले आहे, असल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे.
काय आहेत मागण्या -
- 2019 च्या धर्तीवर पूरग्रस्त शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा आणि पूरग्रस्तांच्या मागणीप्रमाणे विनाअट पुनर्वसन करा
- कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या मार्गावर असलेल्या पुला जवळचा भराव कमी करून तातडीने कमानी पूल बांधा
- पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची सरसकट फी तसेच शैक्षणिक कर्जमाफी करा
- 2005 ते 2019 पर्यंत चार मोठे महापूर आले. या महापुरामुळे नदीकाठची अनेक गावे उद्ध्वस्त झाली आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तातडीने अभ्यास गट नेमून त्यावर त्वरित अंमलबजावणी करावी
- महापुरामुळे शेतकरी व्यापारी उद्योग धंदे आदींचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी वाहून गेल्या असून विहिरी खचलेल्या आहेत. शेडनेट मोडून पडले आहेत. तसेच यंत्रमागधारकांनाचेही खूप मोठे नुकसान झाले आहे. या सर्वांना शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी
- महापुराचे पाणी ज्या गावात गेले आहे, त्या संपूर्ण गावाला पूरग्रस्त गाव म्हणून घोषित करून सरसकट सर्वांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे
- सामायिक खातेदार असणाऱ्या कर्जदारांचे पंचनामे होत नसल्याने कर्ज खाते ग्राह्य धरून नुकसान भरपाई द्यावी
- ज्या शेतकऱ्यांनी कृषी विमा उतरवलेला आहे, त्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई म्हणून विम्याची संपूर्ण रक्कम देण्याचे आदेश विमा कंपन्यांना द्यावेत
हेही वाचा - सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह करतोय ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची सफर