सांगली- निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी ४ लाखांचा निधी मदत म्हणून सर्वसामान्य शेतकरी व जनतेने दिला आहे. त्यामुळे आरोप करणाऱ्या विरोधकांना हे उत्तर पुरेसे आहे, असे हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे उमेदवार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. ते कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये बोलत होते.
शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, की शेतकऱ्यांची घरे उभी केली, हे २३ एप्रिलला कळेल, असा टोलाही शेट्टी यांनी यावेळी रघुनाथदादा पाटील आणि शिवसेनेकडून लढणारे धैर्यशील माने यांना लगावला आहे.
सांगली आणि कोल्हापूरच्या हातकणंगले मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. लक्षवेधी लढत असणाऱ्या या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर शेतकरी संघटनेचे नेते व हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले रघुनाथदादा पाटील यांनी टीका केली होती. राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून मतदारसंघाचे वाटोळे केल्याचा, आरोप त्यांनी सांगलीमध्ये केला होता. या आरोपांना खासदार शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.