सांगली- दुष्काळी भाग म्हणून ओळख असणाऱ्या आटपाडीतील राजेवाडी तलाव हा सध्या ओसांडून वाहणाऱ्या पाण्यामुळे पर्यटनस्थळ बनले आहे. मनमोहक स्वरूप प्राप्त झालेले हे तलाव पर्यटकांना भुरळ घालत आहे. याठिकाणी हजारो पर्यटक पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्याबरोबर सेल्फीसाठी गर्दी करत आहेत.
जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून आटपाडी तालुक्याची ओळख आहे. मात्र या वर्षी तालुक्यावर वरुणराजाची चांगलीच कृपा दृष्टी झाली आहे. तब्बल ९ वर्षापासून कोरडा ठाक असलेला हा ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव पाण्याने भरून गेला आहे. त्यामुळे बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी ओसांडून वाहत आहे. आणि यामुळे तलावाला धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.