सांगली -अतिवृष्टीमुळे वसगडे येथील पुलाचा भराव वाहून गेल्याने मिरज-पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक गेले काही दिवसांपासून ठप्प होती. मात्र, पुलाच्या दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्याने आता ही वाहतूक सुरळीत झाली आहे. दरम्यान या मार्गावर धावणाऱ्या 4 पॅसेंजर गाड्यांचे एक्सप्रेसमध्ये रूपांतर करण्यात आले आहे, तर काही गाड्या तूर्तास बंद करण्यात आल्या आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
ठप्प झालेली मिरज-पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू
पलूस तालुक्यातल्या वसगडे याठिकाणी असणारा रेल्वे पुलाचा भराव अतिवृष्टीमुळे झालेल्या पुराने वाहून गेला होता. त्यामुळे या ठिकाणची रेल्वे वाहतूक धोकादायक बनल्याने रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील सर्व वाहतूक रद्द केली होती. ती आता परत सुरू करण्यात आली आहे.
वाहून गेलेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर रेल्वे प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे आता या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत झाली आहे. दरम्यान या मार्गावर धावणाऱ्या काही पॅसेंजर गाड्यांचे रुपांतर एक्स्प्रेसमध्ये करण्यात आले आहे. ज्यामध्ये मिरज-हुबळी, मिरज- परळी, कोल्हापूर-पुणे आणि मिरज-कॅसलरॉक पॅसेंजर या चार गाड्यांचा समावेश आहे.
त्याचबरोबर मिरज मार्गे धावणाऱ्या सहा रेल्वे गाड्या या बंद करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनचा रेल्वे विभागाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता रेल्वे सेवा सुरू झाली असली, तरी प्रवाशांचा त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तूर्तास काही गाड्या बंद करण्याबरोबर पॅसेंजर गाड्यांचे एक्स्प्रेसमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मिरज, पुणे, कोल्हापूर, पंढरपुर आणि बेळगाव मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होणार आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला 150 किलोमीटरच्या आतील अंतराच्या पॅसेंजर गाड्या या नियमित सुरू राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.