सांगली- कर्ज वसूलीचा यापुढे तगादा लावल्यास संबंधित वसुली अधिकाऱ्यांना झोडपून काढणार, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. खासगी बँकासह व मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्ज वसुलीला सरकारने तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली. दोन वर्षांसाठी संपूर्ण कर्ज माफी करावी, अशी मागणीही पाटील यांनी सरकार केली आहे. ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
'कर्ज वसुलीला याल.. तर झोडपून काढू' - loan recovery in pandemic in Sangli
टाळेबंदी काढली असली तरी सर्व व्यवसाय व व्यवहार हे पूर्णपणे सुरू झालेले नाहीत. अशा स्थितीत कर्ज घेतलेल्या सर्वसामान्य जनतेकडे मुजोर बँका वसुलीचा तगादा करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी सांगितले.
!['कर्ज वसुलीला याल.. तर झोडपून काढू' शेतकरी नेते रघुनाथ पाटील](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8729813-654-8729813-1599577827665.jpg)
सध्याच्या कोरोनाच्या संकटामध्ये औषधोपचार करायलासुद्धा जनतेकडे पैसे नाहीत. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक शेतकरी आपल्या कर्जाचा हप्ता कसा भरू शकेल, असा सवाल शेतकरी संघटनेचा नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला. केंद्र आणि राज्य सरकारने राष्ट्रीयीकृत बँका, मायक्रोफायनान्स व खाजगी बँका या सर्वांना तातडीने कर्ज वसूली थांबवण्याचे आदेश द्यावेत,अशी मागणी रघुनाथ पाटील यांनी केली आहे.
पुढे रघुनाथ पाटील म्हणाले, की कर्जवसुलीचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचला आहे. मात्र सरकार यावर आपली भूमिका स्पष्ट करायला तयार नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसात केंद्र आणि राज्य सरकारने याचा निर्णय घ्यावा. यापुढे जर कर्जाच्या वसुलीसाठी कोणताही वसुली अधिकारी तगादा लावून जनतेच्या दारात कर्जाच्या वसुलीसाठी आला तर त्याला शेतकरी संघटना झोडपून काढेल,असा इशारा रघुनाथ पाटील यांनी दिला आहे.