सांगली - शेतकऱ्यांकडून वीज बिलाच्या नावाखाली वीज कंपनीने ३० हजार कोटींची लूट केल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर तरी शेतकऱ्यांनी आता वीज बिल भरू नये, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी सांगलीत केले. लुटलेले पैसे परत मिळवण्यासाठी तगादा लावण्याचा सल्लाही यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
शेती पंपाची वीज बिले वसुली करून वीज कंपनीने राज्यातील शेतकरी आणि सरकारकडून ३० हजार कोटी अधिकचे पैसे वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरकारच्या अहवालातच या बाबी पुढे आल्याची माहिती यावेळी पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांनी शेती पंपाची वीज बिले भरू नयेत, असे आवाहन १९९८ मध्ये सांगलीच्या मिरजेत पार पडलेल्या शेतकरी अधिवेशनात शरद जोशी यांनी केले होते. 'कर, कर्जा नही देंगे, बिजली का बील नही देंगे, अशी घोषणा त्यावेळी देण्यात आली होती. शेतकरी संघटना या भूमिकेवर अजुनही ठाम आहे. शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते, काही शेतकरी गेल्या १० वर्षांपासून ही बिले भरत नाहीत. असे असले तरी बहुतांश शेतकरी हे पैसे भरत आहेत.