सांगली - मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ शेतकरी संघटना पुढे आली आहे. कायद्याची भाषा करणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांनी सत्तेच्या काळात कायद्याचा वापर का केला नाही? असा सवाल शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी उपस्थित केला आहे. सांगलीच्या साखराळे येथे ते बोलत होते.
"विचारवंतांच्या मारेकऱ्यांचा तपास न लावणाऱ्या फडणवीसांना कोणती शिक्षा द्यावी?" - anant kurmuse
दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांचा तपास न लावणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना काय शिक्षा दिली पाहिजे? असा सवाल करत फडणवीस यांच्यावर रघुनाथ पाटील यांनी टीका केली आहे.
समाज माध्यमावर आक्षेपार्ह टीका केल्याने ठाण्यातील अनंत करमुसे या तरूणाला मारहाण केल्याची घटना घडली होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडून ही बेदम आणि अमानुष मारहाण झाल्याचा आरोप तरुणाने केला आहे. यावरून राज्यात आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करत त्यांची पदावरून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
याप्रकरणी आता शेतकरी संघटना, मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ सरसावली आहे. पाटील म्हणाले, आव्हाड यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिकेचे उत्तर त्यांना चांगल्या पद्धतीने दिले आहे. मात्र, आता काही बुद्धीजीविंची आव्हाड यांच्याविरोधात वळवळ सुरू झाली आहे. फडणवीस यांनी आक्षेपार्ह टीका करणाऱ्याला कायदेशीर मार्गाने शिक्षा दिली पाहिजे, असे मत व्यक्त करत कायद्याची भाषा वापरली आहे. मात्र, ५ वर्षे मुख्यमंत्री, गृहमंत्री राहिलेल्या फडणवीस यांनी दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या खुनाच्या बाबतीत काय तपास लावला? कोणत्या मारेकऱ्यांचे शोध लावला. अजून त्यांचे नातेवाईक खुन्याचा शोध लावण्यासाठी आक्रोश करत आहेत. त्यामुळे तपास न लावू शकणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना काय शिक्षा दिली पाहिजे, असा सवाल करत फडणवीस यांच्यावर रघुनाथ पाटील यांनी टीका केली आहे.