सांगली- शेतकऱ्यांची २८० कोटी रुपयांची एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांच्याकडून तत्काळ थकाबाकी वसूल करून शेतकऱ्यांची थकित देणी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
ऊस गळाप हंगाम संपला आहे. मात्र, अद्याप जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची एफआरपी देण्यात आलेली नाही. काही कारखाने वगळता जवळपास सर्वच कारखान्यांनी एफआरपी थकवली आहे. थकित एफआरपी देण्याबाबत साखर आयुक्त कार्यालयाकडून साखर जप्तीचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत कारवाई होत नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. तसेच त्यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची भेट घेतली.