महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मृत्यु पप्पांना आधीच दिसला होता का ? आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता यांची भावनिक पोस्ट - Smita Thorat post on RR patil

स्मिता पाटील-थोरात यांनी पोस्टमध्ये म्हटले, की आज 8 नोव्हेंबर ...बरोबर 7 वर्ष झाली. माझ्या वडिलांना आज घरातून शेवटचे बाहेर जाऊन ..! आजच्या दिवशी 2014 मध्ये सकाळी 11 वाजता माझ्या वडिलांनी घर सोडले. काही दिवस दिल्लीला विश्रांतीसाठी निघालोय, असे पप्पांनी माझ्या आजीला सांगितले होते.

आर आर पाटील यांचे कुटुंब
आर आर पाटील यांचे कुटुंब

By

Published : Nov 9, 2021, 8:15 PM IST

सांगली -माजी गृहमंत्री आर. आर. आबा पाटील यांच्या निधनानंतर अनेक दिग्गज नेते आबांच्या आठवणींना आजही उजाळा देतात. आबांचे चिरंजीव रोहित पाटील आणि कन्या स्मिता पाटील-थोरात यांनी आबांच्या सोबतच्या घरातील शेवटच्या भेटीच्या आठवणीचा प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी निधनापूर्वी चार महिने म्हणजे 8 नोव्हेंबर 2014 रोजी रोजी मुलांची शेवटची भेट घेतली होती. डोळ्यात पाणी आणून आबांनी घेतलेली गळाभेट आणि ग्रामस्थांच्या सत्काराला आबांनी दिलेले उत्तर यांची स्मिता यांनी आठवण सांगितली आहे. माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी नेते आर. आर. पाटील यांचे अकाली जाणे खरेतर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनाला चटका लावणारे होते. आजही आबांच्या आठवणी व उणीव भासत असल्याच्या गोष्टी अनेक वेळा समोर येतात. त्यांच्या कुटुंबासोबतची आणि विशेषतः मुलींच्या सोबतची आठवण समोर आली आहे.

हेही वाचा-फडणवीस - मलिक यांच्यातील आरोप प्रत्यारोपाला कारणीभूत ठरणाऱ्या 'त्या' जमिनीचा पाहा ग्राउंड रिपोर्ट

स्मिता यांनी लिहिलेली घरातील ती शेवटची आठवण...

स्मिता पाटील-थोरात यांनी पोस्टमध्ये म्हटले, की आज 8 नोव्हेंबर ...बरोबर 7 वर्ष झाली. माझ्या वडिलांना आज घरातून शेवटचे बाहेर जाऊन ..! आजच्या दिवशी 2014 मध्ये सकाळी 11 वाजता माझ्या वडिलांनी घर सोडले. काही दिवस दिल्लीला विश्रांतीसाठी निघालोय, असे पप्पांनी माझ्या आजीला सांगितले होते. 3 नोव्हेंबरला नवीन विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पप्पांनी अत्यंत घणाघाती भाषण केले होते. या भाषणाचे महाराष्ट्र विधानसभेने टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले होते.

हेही वाचा-नवाब मलिकांनी अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या व्यक्तींकडून जमीन विकत घेतली; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

दोन्ही मुलींना मिठी मारून आबा गहिवरले...

पुढे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, की 6 नोव्हेंबरला पप्पा अंजनीला घरी आले. हेलिकॉप्टरमधून सगळे गाव दोन - दोनदा फिरून बघितले. घरातून बाहेर जाताना पप्पा नेहमी उपस्थित सर्व लोकांना अभिवादन करत असत. त्याचप्रमाणे खिडकीतून सर्व कुटुंबीयांकडे बघून जात असत. पण त्या दिवशी मात्र पप्पा जाताना लोकांमधून वेळ काढून मी व माझी बहिण सुप्रिया असलेल्या रूममध्ये आले. त्यांनी आम्हा दोघा बहिणींना घट्ट मिठी मारली. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात पाणी उभारले होते. आम्ही दोघी बहिणी ही विचार करू लागलो की पप्पांना काय वाटले असावे? पप्पांनी मिठ्ठी मारली व त्यांच्या डोळ्यात का पाणी उभारले असावे ? पण आम्हाला वाटले नव्हते की, आज पप्पांनी आम्हाला शेवटचे खुशीत घेतले असावे.

हेही वाचा-विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर; शिवसेना रामदास कदमांचे तिकीट कापणार?


गावाकडून हा शेवटचा सत्कार ठरावा...

त्या दिवशी पप्पांनी गावच्या मारूती-शंकराचेही न चुकता दर्शन घेतले होते. स्वतःच्या गावात चावडीसमोर निवडून आल्याबददल सत्कार स्वीकारताना पप्पा म्हणाले होते की, स्वतःच्या गावाकडून हा माझा शेवटचा सत्कार ठरावा! आता आणखी किती सत्कार करणार... ? मृत्यु पप्पांना आधीच दिसला होता का? अशा शब्दात स्मिता पाटील -थोरात यांनी मुलींच्या आणि गावाच्या सोबत आबांच्या शेवटच्या आठवणीना उजाळा देणारी पोस्ट सोशल मीडियावर केली. ही पोस्ट आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनीही शेअर केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details