सांगली - दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावरून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीतील आंदोलक दहशतवाद माजवत आहेत, असा त्यांनी आरोप केला आहे. तसेच काही मंडळी या आंदोलनाच्या माध्यमातून रक्तपात कसा होईल आणि दिल्लीच्या तख्ताकडे जाण्याचा मार्ग कसा सुकर होईल. यादृष्टीने हे आंदोलन सुरुवातीपासून करत आहेत. असाही आरोप माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
आंदोलनकर्त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही घेणेदेणे नाही-
तसेच दिल्लीतील आंदोलनकर्ते सरकारशी चर्चाही करणार नाहीत. न्यायालयाचेही ऐकणार नाहीत. केवळ कायदेच रद्द करा, अशी मागणी धरून बसलेत. यामुळे शेती क्षेत्र मुक्त होता कामा नये. देशातील शेतकरी गुलामच राहिला पाहिजे. सरकारच्या हस्तक्षेपातच शेती व्यवसाय चालला पाहिजे, अशी हटवादी भूमिका आंदोलक घेऊन बसलेत. असे खोत म्हणाले. त्याचबरोबर आंदोलनकर्त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही घेणेदेणे नाही. हे आंदोलक दहशतवाद माजवत आहेत, असा गंभीर आरोप यावेळी खोत यांनी केला आहे. सांगलीच्या इस्लामपूर मध्ये ते बोलत होते.
हेही वाचा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात विदर्भवादी संघटना आक्रमक