महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान 4 ते 5 नेत्यांचा भाजप प्रवेश, आमदार देशमुखांचा गौप्यस्फोट - काँग्रेस आमदार विश्वजीत कदम

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप घडणार असल्याचे भाकित देशमुख यांनी केले.

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रे दरम्यान 4 ते 5 नेत्यांचा भाजप प्रवेश

By

Published : Aug 3, 2019, 6:40 PM IST

सांगली- मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान मोठा राजकीय भूकंप घडणार आहे. यावेळी 4 ते 5 मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार, असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केला. सांगलीमध्ये महाजनादेश यात्रेच्या नियोजन निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पृथ्वीराज देशमुख, आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष, सांगली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा 29 ऑगस्ट रोजी सांगलीमध्ये दाखल होणार आहे. त्यानिमित्ताने महाजनादेश यात्रा समन्वयक आणि कामगार व पर्यावरण राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यानंतर संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाचे सांगली जिल्हाध्यक्ष व आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रा निमित्ताने 3 सभा पार पडणार असल्याचे सांगितले. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप घडणार असल्याचे भाकित देशमुख यांनी केले.

जिल्ह्यातील 4 ते 5 नेत्यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला. मात्र, हे नेते कोण असतील याबाबत देशमुख यांनी गुप्तता पाळली आहे. 29 ऑगस्ट रोजी सर्व स्पष्ट होईल, असे सांगत राजकीय भूकंपाचा इशारा दिला. तसेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आठही मतदारसंघात भाजपचे आमदार असतील, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.

देशमुख यांच्या विधानानंतर आता हे 4 ते 5 बडे नेते कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच हे नेते काँग्रेसमधील की राष्ट्रवादीमधील हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे.

काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम आणि शिराळ्याचे काँग्रेस नेते सत्यजित देशमुख हे भाजपमध्ये जाणार असल्याची वारंवार चर्चा सुरू होती. यावर शुक्रवारी काँग्रेसच्या मेळाव्यात आमदार विश्वजीत कदम आणि सत्यजित देशमुख यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर नुकतेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते दिलीप पाटील यांनी आपल्याला भाजपामधून जयंत पाटलांच्या विरोधात लढण्याची ऑफर आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याचा दबाव होता, असा गौप्यस्फोट केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर देशमुख यांच्या विधानानंतर जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details