सांगली- लोकसभेच्या सागंली मतदारसंघासाठी मंगळवारीमतदान पार पडत असून यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर आज ईव्हीएम मशीन रवाना झाल्या आहेत. या मतदारसंघात एकूण १८ लाख ३ हजार ५४ इतकी मतदार संख्या असून या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळत आहे.
सांगली लोकसभा निवडणूकीसाठी भाजप, स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात अत्यंत चुरशीने लढत असून उद्या मतदान पार पडत आहे. या मतदारसंघातून एकूण १२ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, उद्या होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी ७ वाजल्या पासून मतदानाला सुरुवात होणार आहे.
सांगली लोकसभा मतदार संघात गतवेळी ६३.६८ टक्के मतदान झाले होते. तर यंदा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. उद्या पार पडणाऱ्या मतदानासाठी मशीन घेऊन कर्मचारी रवाना झाले आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू होती. याचा आढावा घेतला आहे,आमचे सांगलीचे ईटीव्ही भारताचे प्रतिनिधी यांनी..