सांगली - महाराष्ट्रात वसंतदादा पाटील घराणे म्हणजेच काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच वसंतदादा पाटील घराणे असे असताना जाणीवपूर्वक आमच्या कुटुबांविषयी वावड्या उठविल्या जातात. आमच्या कुटुंबातील सदस्य कदापीही भाजपमध्ये जाणार नाही, असे स्पष्टीकरण माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी दिले आहे.
वसंतदादा पाटील घराणे कदापी भाजपत जाणार नाही; प्रतिक पाटलांचे स्पष्टीकरण - Pratik Patil
आपल्या कुटुबीयांपैकी कोणीही भाजपत जाणार नसल्याचे स्पष्टीकरण प्रतिक पाटील यांनी दिले आहे.
![वसंतदादा पाटील घराणे कदापी भाजपत जाणार नाही; प्रतिक पाटलांचे स्पष्टीकरण](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2759042-900-f4f83e1f-19c6-458a-b0dc-1eb7eff3f208.jpg)
रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर वसंतदादा पाटील घराण्याचे सदस्यही भाजपत प्रवेश करणार अशी माध्यमात चर्चा होती. यासंबधी स्पष्टीकरण देताना प्रतीक पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. वसंतदादा पाटील घराणे काँग्रेसशी आत्तापर्यंत एकनिष्ठ राहिले असून यापुढेही राहील. काँग्रेसने नेहमीच आमच्या कुटुंबाला भरभरून दिलंय त्यामुळे भाजपकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही, तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत या निवडणुकीच्या दरम्यान कुठलीही भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले.
लोकसभेच्या उमेदवारीवरुन बोलतांना प्रतिक पाटील म्हणाले की, मला आता सक्रिय राजकारणात फारसा रस नाही. त्यामुळे आपले बंधू विशाल पाटील यांच्यासाठी आपण प्रयत्नशील होतो. मात्र, काँग्रेसकडून ही जागा मित्र पक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत आपल्याला खंत वाटत असल्याचे प्रतीक पाटील यांनी यावेळी बोलून दाखविले, असे असले तरी आपण आणि आपले कुटुंबीय काँग्रेस सोडून कदापिही भाजपमध्ये जाणार नसल्याचे यावेळी प्रतीक पाटलांनी स्पष्ट केले.