सांगली -ओबीसी महामेळाव्याच्या तारखेवरून ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडल्याचे समोर आलेले आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हक्के यांनी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यावर टीका करत महामेळावा 25 तारखेला होणार असताना स्वतःच्या फायद्यासाठी राजकीय हेतून तो 27 तारखेला होणार असल्याचे जाहीर केले आहे, असा आरोप हक्के यांनी केला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.
ओबीसी नेत्याची प्रकाश शेंडगेंवर टीका मेळाव्यावरून ओबीसी नेत्यांमध्ये जुंपली..नोकरी भरतीसह विविध मागण्यांसाठी राज्यातील ओबीसी समाजाने एकत्र येत सांगलीमध्ये ओबीसी समाजाचा महामेळावा घेण्याचा निर्धार केला होता. याबाबत ओबीसी नेत्यांची एक बैठक सांगलीमध्ये पार पडली होती. ज्यामध्ये माजी आमदार प्रकाश शेंडगे, लक्ष्मण हाके यासह ओबीसी समाजातील नेते, पदाधिकारी उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये प्रकाश शेंडगे यांनी 27 फेब्रुवारी रोजी सांगलीमध्ये राज्य सरकारला इशारा देण्यासाठी ओबीसी समाजाचा महामेळावा पार पडणार असल्याचे जाहीर केलं होतं. या मेळाव्याला राज्याचे मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, दत्ता भरणे, संजय राठोड यासह आमदार व नेते उपस्थित राहणार असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केले होते.
मेळाव्यात फूट पाडण्याचा उद्योग -मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 25 तारखेला महामेळावा होणार असल्याचं जाहीर करत माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यावर टीका केली आहे. शेंडगे हे स्वतःला प्रेझेंटेशन करण्यासाठी आणि आपल्या राजकीय फायद्यासाठी 27 तारीख परस्पर जाहीर केली आहे. वास्तविक 25 फेब्रुवारी रोजी ओबीसी महामेळावा मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. आज राज्यातला ओबीसी समाज एकत्र येत असताना प्रकाश शेंडगे मात्र 27 तारीख जाहीर करून महामेळाव्यात फूट पाडण्याचा काम करत असल्याचा आरोप हक्के यांनी केला आहे. तसेच शेंडगे हे ओबीसी नेते आहेत. त्यामुळे त्यांनी या महामेळाव्याला ओबीसी नेता म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन हक्के यांनी केले आहे.