सांगली - इस्लामपूर येथील प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर कोविड रुग्णांना सेवा देणार्या डाॅक्टर्स व सहकारी स्टाफवर ॲट्राॅसिटीसारखे दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी डाॅक्टर्स व सहकारी स्टाफचे साखळी उपोषण सुरु आहे.
यावेळी बोलताना प्रकाश कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजीत पाटील म्हणाले, हाॅस्पिटलच्या माध्यमातून डाॅक्टर्स व सहकारी स्टाफने स्वत:चा जीव धोक्यात घालून कोविड रुग्णांची सेवा केली. अनेक रुग्ण बरे होऊन गेले. आमच्या तीन कर्मचार्यांना कोरोनाची लागण होऊन जीव गमवावा लागला. अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली जात असताना राजकीय द्वेषापोटी प्रकाश हाॅस्पिटलला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे, मात्र जनतेला ज्ञात आहे कोरोना संकटात रुग्ण व नातेवाईकांना कोणी धीर व आधार दिला.
गेल्या पाच सहा दिवसापासुन वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन, उपोषण, निषेध सुरु आहेत. आज आमच्या सहकार्यांवर अन्याय होत आहे. या पोटतिडकीने सांगत असतानाही सरकारी प्रशासनातील एक ही सक्षम अधिकारी फिरकले नाहीत याचा अर्थ हे अधिकारी कोणाच्या तरी दबावाखाली आहेत व त्यांना तसा कानमंत्र मिळत असेल असे वाटत आहे. यापूर्वी तक्रारींचा कागद घेऊन चौकशीसाठी येणारे अधिकारी हाॅस्पिटलमधील डाॅक्टर व सहकाऱ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत गंभीर नाहीत हे स्पष्ट दिसत आहे. हा लढा आमचा न्याय मिळेपर्यत सुरू राहणार असून हे गुन्हे मागे घेतले नाही तर आम्ही याबाबत पुढील दिशा लवकरच ठरविणार आहोत.
सध्या सर्व डाॅक्टरर्स व सहकारी स्टाफ भयभीत झाला असुन असुरक्षित असल्याच्या मानसिकतेत आहे. प्रामाणिक व कुटुंबापासुन दुर राहून स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करुनही अशा संकटकाळात राजकारनातून खोटे गुन्हे दाखल करण्यापर्यत विकृत विचार येत असेल तर भविष्यात तालुक्यातील जनता तर कशी सुरक्षित राहील, हा प्रश्न आहे. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता न्यायनिवाडा करुन योग्य न्याय आम्हांला द्यावा व व्यक्तीपेक्षा संस्था मोठी असते अनेक कुटुंबांचे संसार त्या संस्थेतील नोकरीमूळे फुलत असतात. यामुळे कर्मचार्यांबरोबर संस्थेचाही विचार करणे आवश्यक आहे. संस्था बदनाम करण्याच्या व अधिकारी, कर्मचारी यांच्या घरातील चुलीत कोणी पाणी ओतण्याचा प्रयत्न करत असेल तर भविष्यात अशा विकृत विचाराला जशास तसे उत्तर आम्ही कर्मचारीच देऊ असा इशारा शेवटी कामगार अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिला.