सांगली- वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील वारणा बझार मुदत संपलेली साखर विक्री केल्यामुळे सील करण्यात आला होता. कोणताही आदेश नसतानाही बझार पुन्हा सुरु केल्याने पाहणी करायला गेलेल्या प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील चारचाकी वाहनाची तोडफोड झाली आहे. बझार प्रशासनानेही प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांविरोधात कुरळप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
प्रहार संघटनेकडून मुदत संपलेल्या साखर विक्रीची पोलखोल वारणा बझारमध्ये ऊस उत्पादक सभासदांना सवलतीच्या दरात साखर कारखान्याच्या माध्यमातून साखर दिली जाते. कारखान्याच्या सबंधित असणाऱ्या वारणा बझार साखरचे वाटप सरु होते. त्या साखरेच्या पोत्यावर डिसेंबर 2019 रोजी मुदत संपत असल्याचे रीतसर छापले असतानाही बझारवाले या साखरेची राजरोस विक्री करत होते. याची माहिती प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील यांना समजताच त्यांनी अन्न भेसळ अधिकाऱ्यांना कळवले.
हेही वाचा-एकरकमी एफआरपी जाहीर केल्याशिवाय कारखान्यांची धुरांडी पेटू देणार नाही- सदाभाऊ खोत
अधिकाऱ्यांनी कोरोनामुळे क्वारंटाइन असल्याचे सांगत गावपातळीवर कारवाई करावी, असे सांगितले. यानंतर प्रहारच्या स्वप्नील पाटील, दीपक पाटील, मारुती पाटील आदी ग्रामस्थांनी ऐतवडे खुर्द येथील तलाठी, ग्रामसेवक यांना माहिती देत बझार मध्ये जाऊन सदर साखर विक्री बंद केली. प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या सांगण्यामध्ये तथ्य आढळल्याने तलाठी व ग्रामसेवक यांनी पंचनामा केला.यावेळी मुदत संपलेली सात टन साखरेची पोती आढळून आली. दीड दोन टन साखरेची पोती विकल्याचे दिसून आले तर रितसर पंचनामा करुन बझार सील करण्यात आला होता.
बझार सुरु करण्याचा आदेश नसतानाही सबंधित बझार प्रशासनाने बझार पुन्हा सुरू केला होता. बझार सुरु केल्याची माहिती मिळताच स्वप्नील पाटील आपल्या चार कार्यकर्त्यांना घेऊन पाहणी करण्यासाठी गेले होते.यावेळी ऐतवडे खुर्द येथील काही जणांनी स्वप्नील पाटील यांच्यावर व गाडीवर हल्ला करत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यावेळी कुरळप पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाल्याने पुढील अनर्थ टळला.
वारणा बझारच्या वतीने स्वप्नील पाटील रा. वसी व दीपक पाटील, संजय आनंदा पाटील रा. ऐतवडे खुर्द यांनी दारूच्या नशेत जबरदस्तीने वारणा बझार मध्ये घुसून साहित्याची मोडतोड करत हाताने मारहाण केली. शिवीगाळ करत बझार बंद केल्याची फिर्याद विकास सदाशिव लबडे रा. लादेवाडी यांनी कुरळप पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे.
जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्यावर खोटे आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. स्वप्नील पाटील यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करत गाडीची मोडतोड केल्या प्रकरणी बझार मधील कर्मचारी व प्रताप पाटील यांच्यावर जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत पोलीस स्टेशन मधून जाणार नाही, असा पवित्रा प्रहार कार्यकर्त्यांनी घेतला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उशीर पर्यंत पोलीस ठाण्यात तळ ठोकून बसले असल्याने उशिरा पर्यंत कारवाई सुरु होती.