महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी पोस्ट कोविड सेंटर सुरू - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज

कोरोनामुक्त झाल्यानंतरसुध्दा काही रुग्णांमध्ये इतर आजार उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयाच्या वतीने पोस्ट कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.

Sangli Post Covid Center started
सांगलीत पोस्ट कोविड सेंटर सुरू

By

Published : Oct 10, 2020, 3:35 PM IST

सांगली- कोविड आजारातून बरे झालेल्या काही रुग्णांना पुन्हा काही वेगवेगळे त्रास होऊ शकतात. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांना तपासणे व आवश्यक औषधोपचार करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे पोस्ट कोविड ट्रिटमेंट सेंटर सुरू करण्यात आले आहे. कोविड मधून बरे झाल्यानंतर त्रास उद्भवणाऱ्या रुग्णांना हे सेंटर अतिशय महत्वाचे ठरणार आहे, असे मत जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केले आहे.

जिल्ह्यात मार्चपासून आज अखेर जवळपास 40 हजारजण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी 34 हजारजण कोरोनामुक्त सुद्धा झाले आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतरसुध्दा काही रुग्णांमध्ये इतर आजार उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयाच्या वतीने पोस्ट कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.

सांगलीत पोस्ट कोविड सेंटर सुरू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे पोस्ट कोविड-19 बाह्यरुग्ण विभागाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रदिप दीक्षित, वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर मूर्ती, उप वैद्यकीय अधिक्षक डॉ. दत्ता भोसले उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज हे मार्चपासून डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल म्हणून काम करीत आहे. याठिकाणी पोस्ट कोविड ट्रिटमेंट सेंटर सुरू केले असून आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. जे नागरीक कोविड आजारातून बरे झाले आहेत. त्यापैकी कोणालाही काही त्रास होत असल्यास त्यांच्याकरिता सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत पोस्ट कोविड ट्रिटमेंट सुरू राहणार आहे. आवश्यकतेनुसार आणखी पुढे दिवसही वाढू शकतात. याचा खूप मोठा फायदा रुग्णांना होईल, असे मत जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details