सांगली -महापुराच्या संकटानंतर सांगली जिल्ह्यात आणखी एक संकट उभे ठाकले आहे, ते म्हणजे दरडी कोसळण्याचे. शिराळा तालुक्यातल्या डोंगरी भागात दरड कोसळून गावं, वाड्या-वस्त्या गाडल्या जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जवळपास 50 हून अधिक वाड्या-वस्त्या दरड कोसळण्याच्या भीतीच्या छायेखाली जगत आहेत. शासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरज आहे, अन्यथा माळीण, तळीये, आंबेघर सारख्या दुर्घटनांची पुनरावृत्ती शिराळा तालुक्यात घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भिती व्यक्त होत आहे, पाहुयात ईटीव्ही भारतचा हा ग्राउंड रिपोर्ट..
आणखी एका संकटाची टांगती तलवार..
सांगली जिल्ह्याला यंदा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला कृष्णा आणि वारणा काठाला महापुराचा तडाखा बसला. या महापुराने प्रचंड वित्तहानी झाली आहे, पण सुदैवाने एकही जीवितहानी झाली नाही. असं असलं तरी आता दुसऱ्या बाजूला जीवितहानी होण्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. कारण शिराळा तालुक्यातील डोंगरी भागात दरड कोसळण्याबरोबर भूस्खलन होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे एक मोठं संकट शिराळा तालुक्यातील डोंगरी भागात निर्माण झाले आहे.
शिराळा तालुक्यात भुस्खलनाचे संकट 50 वाड्या-वस्त्यांवर दरडी कोसळण्याची भिती ! शिराळा तालुक्यातील 70 टक्के भाग हा अति दुर्गम आणि डोंगरी भाग आहे. कोकणाच्या सीमेवर आणि सांगली जिल्ह्याचे शेवटचं टोक आहे. कोकणाशी संलग्न असल्याने याठिकाणी कोकणाप्रमाणे प्रचंड पाऊस पडतो. यंदाही शिराळा तालुक्यात अतिवृष्टी, ढगफुटी झाली आहे. 585 मिली मीटर इतक्या पावसाची एकाच दिवसात नोंद झाली. परिणामी तालुक्यातील चांदोली धरण भरले व वारणा नदीला महापूर आला. गेल्या 100 वर्षात एवढा पाऊस कधीच पडला नाही, असे इथले जाणकार सांगतात. या पावसामुळे शिराळा तालुक्यातील डोंगर आता कोसळण्याच्या मार्गावर आहेत. काही ठिकाणी दरड कोसळण्याबरोबर भूस्खलन होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. तालुक्यात जवळपास 50 हुन अधिक वाड्या-वस्त्या आणि काही गावंही डोंगराच्या पायथ्याशी आणि कुशीत वसलेली आहेत. या वाडी-वस्ती व गावांवर दरडी कोसळण्याची टांगती तलवार आहे. कधी दरड कोसळेल हे सांगणे अवघड आहे. इथं ही घडू शकते.. तळीये,आंबेघरची पुनरावृत्ती डोंगराचा भाग घसरू लागला - डफळेवाडी याठिकाणी 25 कुटुंब वस्ती आहे आणि याठिकाणी असणाऱ्या डोंगराचे भूस्खलन होऊ लागले आहे. डोंगराचा कडा काही ठिकाणी सुटू लागला आहे, तर वाडीवर येणाऱ्या रस्त्यावरही दरड कोसळली आहे. या डफळेवाडीतील सीताराम डफळे यांच्या मालकीचा हा डोंगर आहे. याबाबत सीताराम डफळे म्हणाले, डोंगरावर आपली शेती आहे. तसेच जनावरे चरण्यासाठी आणि शेतीसाठी डोंगरावर जावे लागतं. मात्र डोंगराचा भाग कोसळू लागल्याने जी वाट आहे, बंद झाली आहे. काही ठिकाणी मोठया भेगा पडल्या आहेत, तर काही भाग निखळून गेला आहे. मोठा भाग आता खाली सरकू लागला आहे. त्यामुळे आम्ही भिती पोटी डोंगरावर जाणे बंद केले आहे. तर दुसऱ्या बाजूला डोंगराच्या पायथ्याशी आपली घरे आहेत आणि डोंगर कधी कोसळेल याचा नेम नसल्याने मोठी भिती आमच्या मनात निर्माण झाली आहे.
अतिवृष्टीचा परिणाम -
या भागातले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हनुमंतराव पाटील म्हणाले, मुळात शिराळा तालुका हा डोंगरी भाग आहे. चांदोली धरण परिसरात मोठ्या प्रमाणात डोंगर आहेत. तसेच जवळच भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी अनेक वाड्या-वस्त्या डोंगराच्या पायथ्याशी आहेत. तर काही डोंगरावर वसलेले आहेत. तालुक्याला एका बाजूला महापुराचा तडाखा बसला, त्यानंतर आता इथल्या डोंगरी भागाला पडलेल्या प्रचंड पावसाचा फटका बसत आहे. भूसखलन, डोंगर कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. शासनाच्या निदर्शनास या गोष्टी आणून देण्यात आल्या आहेत, असे पाटील यांनी सांगितले.
इथं ही घडू शकते.. तळीये,आंबेघरची पुनरावृत्ती 400 लोकांचे तात्पुरते स्थलांतर - कोकणेवाडी आणि भाष्टेवाडी या दोन ठिकाणी डोंगर खचू लागला आहे. कोकणेवाडी या ठिकाणी जवळपास अडीचशे लोकांची वस्ती आहे. तर भाष्टेवाडी याठिकाणी दीडशेहून अधिक लोकांची वस्ती आहे. कोकणे वाडीतल्या अनेक घरात जमिनीखालून पाझर फुटले आहेत. डोंगराच्या परिसरातला काही भाग खचू लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने दुर्घटनेची शक्यता गृहीत धरून जीवितहानी टाळण्यासाठी येथील ग्रामस्थांचे सुरक्षित असणाऱ्या गुढी पाचगणी या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेत तात्पुरते पुनर्वसन केले आहे. रोज सायंकाळनंतर गावातले लोक शासकीय वाहनातून स्थलांतर करण्यात आलेल्या ठिकाणी जातात, त्यानंतर सकाळी पुन्हा कामानिमित्त गावी परततात. जनावरांची काळजी असेल किंवा शेतीची कामे सायंकाळपर्यंत आटोपुन पुन्हा ग्रामस्थ स्थलांतर करतात कारण रात्रीच्या वेळी दरड कोसळण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवल्याने गेल्या चार दिवसांपासून हा दिनक्रम सुरू असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.
इथं ही घडू शकते.. तळीये,आंबेघरची पुनरावृत्ती तात्पुरते नको कायमस्वरूपी पुनर्वसन करा - दरड कोसळणे आणि भूस्खलन अशी मोठी आपत्ती शिराळा तालुक्यात निर्माण होण्याची शक्यता आहे, त्या सर्व पार्श्वभूमीवर शिराळ्याचे भाजपाचे नेते सत्यजित देशमुख यांनी शासकीय अनास्थेबाबत खंत व्यक्त केला आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकणात महापूर आला, कोकणात दरडीही कोसळल्या. या सर्व परिस्थितीची राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या सर्वांनी दौरे केले. मात्र या दुर्गम आणि डोंगरी भागातल्या प्रश्नांकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे, असा आरोप देशमुख यांनी केला आहे. तसेच शासनाने या सर्वाची तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे. इथल्या नागरिकांचं तात्पुरते पुनर्वसन करण्याऐवजी कायमस्वरूपी पुनर्वसन कसं करता येईल, याबाबतीत सरकारने पालक सचिव पाठवून एक आराखडा तयार करावा तसेच वरिष्ठ भू-तज्ञ पाठवून या दरडी कोसळणे कसं थांबवता येतील, या बाबतीत पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा महाडच्या तळीये असेल सातारचे आंबेघर या ठिकाणी ज्या घटना घडल्या, त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती देशमुख यांनी व्यक्त केली.
प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी -
शिराळा तालुक्यातल्या एकूण परिस्थिती बाबत शिराळा तहसीलदार गणेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, तालुक्यातील डोंगरी भाग असणाऱ्या ठिकाणी दरड कोसळणे असेल किंवा भूस्खलन होत आहे. अशा ठिकाणचे सर्व्हे करण्यात आले असून ज्यामध्ये जी काही धोकादायक वाड्या- वस्त्या आहेत त्यांचे तातडीने तात्पुरतं पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांना योग्य त्या ठिकाणी सुरक्षित स्थलांतर केले आहे. ज्यामध्ये भाष्ठेवाडी आणि कोकणेवाडी या दोन वाड्यांचा समावेश आहे. तर इतर ठिकाणी प्रशासनाकडून तिथल्या ग्रामस्थांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्य़ात आले.