सांगली - आटपाडीच्या डाळिंबांना सध्या इतिहासातील हा सर्वात उच्चांकी दर सोन्याचा भाव मिळतो आहे. एका किलोला 1151 इतका उच्चांकी दर मिळाला आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
अतिवृष्टीमुळे डाळींबाला जबर फटका
सांगली जिल्ह्यातल्या डाळिंब क्षेत्रावर गत वर्षी झालेल्या अतिवृष्टीने मोठा घाला घातला आहे. जवळपास जिल्ह्यातील 90 टक्के डाळिंबाचे क्षेत्र बाधित झाले आहे. डाळिंब उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. परदेशात सुद्धा जेमतेम डाळिंब निर्यात झालेला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा 10% डाळिंबांच्या बागा बहरल्या आहेत. त्यामुळे या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आले आहेत. गेल्या एक महिन्यापासून डाळिंबांना स्थानिक बाजारात उच्चांकी दर मिळाला आहे.
डाळिंबाचे आगार उध्वस्त
डाळिंबाचे आगार म्हणून आटपाडी तालुक्याची ओळख आहे. जिल्ह्यातल्या डाळिंबाच्या क्षेत्रापैकी केवळ आटपाडी तालुक्यात 60 टक्के क्षेत्र आहे. गतवर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामुळे डाळिंबाचे क्षेत्र हे जमिनदोस्त झाले. मात्र अशाही प्रतिकूल परिस्थितीत तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बाग प्रचंड कष्टाने फुलवल्या आहेत. या डाळिंबांना आटपाडीच्या बाजार समितीत उच्चांकी दर मिळत आहेत.