महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हसन मुश्रीफ भाजपमध्ये गेले नसल्याने राजकीय हेतूने छापेमारी; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा आरोप - Chief Minister

जे जे सरकारच्या विरोधात बोलतात आणि सरकारचे ऐकत नाहीत, त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या यंत्रणांचे शुक्लकाष्ठ लावायचे धोरण भाजप सरकारकडून सुरू असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जयंत पाटील

By

Published : Jul 25, 2019, 7:53 PM IST

सांगली- भाजपमध्ये प्रवेश करण्यास नकार दिल्यानेच राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांच्या घरावर छापेमारी घडवून, सूड उगवण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. या विरोधात येत्या पाच ते सहा दिवसात राज्यभर जनजागृती करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ते आज सांगली येथील आष्टा येथे बोलत होते.

जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या आणि मुलाच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे स्थानिक नेते आणि मंत्री असणाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांना एका जाहीर कार्यक्रमात निमंत्रण दिले होते. मात्र, मुश्रीफ यांनी नकार दिल्याने त्यांच्यावर प्राप्तिकर विभागाचे छापे टाकून सूड उगवण्यात आल्याचा आरोप जयंत पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे केला आहे. मात्र, मुश्रीफ यांच्याकडे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या जनतेला दिलेल्या आरोग्य शिफारशींच्या शिवाय कोणतेच धन सरकारला सापडणार नाही, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. या कठीण प्रसंगात कोल्हापूरची जनता मुश्रीफ यांच्या पाठीशी नक्कीच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

भाजप प्रवेशाच्या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील यांनी कोण म्हणतंय मी भाजपमध्ये जाणार आहे ? असा सवाल विचारला. या सर्व अफवा आहेत मी एका पक्षाचा जबाबदार नेता असून अशा चर्चा होऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उद्या मुख्यमंत्री राष्ट्रवादीमध्ये येतील अशा अफवा पसरतील, अशी मिश्किल टिप्पणी जयंत पाटील यांनी यावेळी केली. लोकसभेला मोदींकडे बघून जनतेने मतदान केले. मात्र, विधानसभेला असे होणार नाही, या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मतदान होईल. राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीच सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details