सांगली -शाहरुख नदाफ टोळीवर सांगली पोलिसांनी मोक्का लावला आहे. खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्हे दाखल असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. मोक्का लावण्यात आलेल्या टोळीत सहा जणांचा समावेश आहे.
सांगलीच्या नदाफ टोळीवर मोक्का कारवाई, सहा जणांचा समावेश - नदाफ टोळीवर मोक्का कारवाई
शाहरुख नदाफ टोळीवर सांगली पोलिसांनी मोक्का कारवाई केली. अनेक गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल आहेत.
सांगली शहरातील शंभरफुटी, हनुमान नगर परिसरातील शाहरुख नदाफ याच्या टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. या टोळीवर खुनाचा प्रयत्न, दरोडे, मारामारी, खंडणी, घरफोडी, दहशत माजवणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या दोन वर्षात या टोळीच्या कारवाया वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी नदाफ टोळीवर मोक्का कारवाईचा प्रस्ताव कोल्हापूर विभागाकडे पाठवला होता. विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी या कारवाईला मंजुरी दिली आहे.
नदाफ टोळीचा प्रमुख शाहरुख नदाफ (वय 19 ) याच्यासह त्याचे साथीदार सोहेल उर्फ टोल्या तांबोळी(वय 20), संतोष उर्फ ऋतिक चक्रनारायण (वय 19), अजय उर्फ वासुदेव सोनवले (वय 20), यासह दोन अल्पवयीन मुलांच्यावर ही कारवाई करण्यात आली.