सांगली -स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने काढण्यात येणारी कडकनाथ संघर्ष यात्रा सांगलीमध्ये पोलिसांनी रोखली आहे. जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह 25हुन अधिक कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजपा व रयत क्रांती संघटनेच्या आत्मनिर्भर यात्रेच्या विरोधात स्वाभिमानीकडून ही यात्रा पुकारण्यात आली होती. आज इस्लामपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत किसान आत्मनिर्भर यात्रेचा समारोप होणार होता, त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कडकनाथ यात्रा काढण्याची घोषणा करत कडकडनाथ कोंबड्या उधाळण्याचा इशारा दिला होता.
कडकनाथ कोंबड्या उधाळण्याचा दिला होता इशारा
भाजपा आणि रयत क्रांती संघटनेच्यावतीने कृषी कायद्याच्या समर्थनार्थ माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली 24 तारखेपासून सांगलीतून चार दिवसाची किसान आत्मनिर्भर यात्रा सुरू आहे. तर 27 रोजी इस्लामपूर याठिकाणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून या यात्रेच्या विरोधात कडकनाथ संघर्ष यात्रा काढण्याचे घोषणा करण्यात आली होती. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी कडकनाथ कोंबडी घोटाळाप्रकरणी सर्व प्रकरणाची चौकशी व कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात येत असल्याचे जाहीर करत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणाऱ्या भाजपाच्या किसान आत्मनिर्भर यात्रेच्या समारोप कार्यक्रमात कडकनाथ कोंबड्या उधाळण्याचा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर स्टेशन चौक येथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज कडकनाथ संघर्ष यात्रा काढण्यात येणार होती.
जोरदार निदर्शने
जिल्हाध्यक्ष महेश काळे यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन चौक या ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कडकनाथ कोंबडी घेऊन जोरदार निदर्शने केली आणि यात्रा काढण्याच्या तयारीत असताना सांगली पोलिसांनी स्वाभिमानीची कडकनाथ संघर्ष यात्रा रोखली. यावेळी महेश खराडे यांच्यासह 25हुन अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.