सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राज्यभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर सांगलीतील आटपाडी तालुक्यातल्या झरे याठिकाणी पडळकर यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गोपीचंद पडळकरांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात पडळकर यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना फिरू देणार नाही, असा गर्भित इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला आहे. त्यामुळे पडळकर यांच्या घरासमोर दोन पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. आमदार पडळकर हे सध्या घरीच आहेत त्यामुळे सांगली पोलीस दलाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण -
पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्यावर वादग्रस्त विधान केले. गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे की, 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचे नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचे आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे.' असे विधान पडळकर यांनी केले होते.