सांगली- मुंबई पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक आणि वाहतूक पोलिसासह चौघांवर सांगलीच्या कासेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संचारबंदी व जिल्हाबंदी असताना, विना परवानगी बेकायदेशीर सांगली जिल्ह्यात प्रवेश केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा-"राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री ठाकरेंना विधान परिषदेवर नियुक्ती देण्यात कोणत्या अडचणी आहेत?"
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आहे. तर राज्यासह जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत. अत्यावश्यक सेवा व परवानगी खेरीज ये-जा करण्यास मनाई आहे. मात्र, सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कासेगाव याठिकाणी मुंबईच्या एका पोलीस उपनिरीक्षकाने चौघांसह बेकायदेशीर प्रवेश केल्याचा प्रकार घडला आहे.
मुंबईतील डी.बी.मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक विजय गावडे तसेच वरळी वाहतूक विभागाकडील पोलीस नाईक संतोष किसन जाधव, हर्षदा संतोष जाधव व संतोष जाधव यांची मेहुणी सोहिनी रवी जाधव हे एका खाजगी वाहनातून मंगळवारी पुणे-बंगलुरू महामार्गावरुन कासेगाव हद्दीत पोहचले. यावेळी याठिकाणी असणाऱ्या कासेगाव चेकपोस्टवर कासेगाव पोलिसांचे पथक कार्यरत होते. यावेळी मुंबईहून सांगलीकडे निघालेली गावडे यांची कार पोलिसांनी चौकशीसाठी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना न जुमानता गावडे यांनी आपली गाडी भरधाव वेगाने सांगलीच्या दिशेने नेली.
कासेगाव पोलिसांनी गावडे यांच्या गाडीचा पाठलाग करत नेर्ले येथे महामार्गावर गावडे यांची गाडी आडवली. त्यानंतर गावडे यांच्यासह गाडीतील सर्वांची चौकशी केली. त्यांच्याकडे प्रवास अथवा जिल्ह्यात दाखल होण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.अखेर याप्रकरणी याप्रकरणी कासेगाव पोलिसांनी पोलीस उपनिरिक्षक विजय गावडे तसेच वरळी वाहतूक विभागाकडील पोलीस नाईक संतोष किसन जाधव यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केेला आहे.