सांगली :कवठेमहांकाळ तालुक्यातल्या बोरगाव नजीक शिरढोण रस्त्यावर बाळासाहेब रामराव शिंदे (वय 68) या वृद्धाचा खून झाल्याचा प्रकार घडला होता. धारदार शस्त्रांनी भोसकून बाळासाहेब शिंदे यांचा खून झाला होता. सदर घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये झाली होती. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून कवठेमहांकाळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त पथकांकडून खुनाचा तपास सुरू करण्यात आला होता. खुनाच्या घटनेनंतर अवघ्या दोन तासांमध्येच मृत बाळासाहेब शिंदे यांच्या खून प्रकरणी तिघाजणांना अटक करण्यात आली आहे.
हत्या केल्याची कबुली :यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. संजय उर्फ दादया तुपसौंदर्य (वय 22 ,राहणार, संजयनगर,सांगली) योगेश बाबासो कांबळे (वय 19 ,राहणार गुळवची, तालुका जत, सांगली) आणि एक अल्पवयीन मुलगा, असे तिघांना अटक करण्यात आली आहे. बाळासाहेब रामराव शिंदे यांच्या एक्सयुव्ही महिंद्रा गाडीला तिघांची रिक्षा घासली. त्यामुळे झालेल्या वादातून त्यांनी, ही हत्या केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे.
महिंद्रा गाडी आणि रिक्षा घासली :याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून मिळालेली अधिक माहिती याप्रमाणे बाळासाहेब रामराव शिंदे (वय वर्ष 68, राहणार वाघोली, तालुका कवठेमहांकाळ, सांगली) हे आपल्या एक्स यु व्ही महिंद्रा गाडीतून शिरढोणकडे निघाले होते. तर संजय उर्फ दाद्या तुपसौंदर्य, योगेश बाबासो कांबळे, आणि एक अल्पवयीन मुलगा, हे तिघेजण त्यांच्या एका मित्राची रिक्षा घेऊन ढालेवाडीकडे निघाले होते. यावेळी बोरगाव-शिरढोण रस्त्यावर बाबासाहेब शिंदे यांची महिंद्रा गाडी आणि रिक्षा घासली.
तिघांबरोबर वादावाद :त्यानंतर रिक्षातून उतरलेले संजय उर्फ दादया तुपसौंदर्य, योगेश बाबासो कांबळे आणि एक अल्पवयीन मुलगा, यांनी बाबासाहेब शिंदे यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केला. यातून शिंदे यांना तिघांनी धक्काबुक्की आणि मारहाण सुरू केले. यातून वाद वाढला आणि रागाच्या भरात चाकूने भोसकले. या घटनेनंतर तिघांनीही रीक्षासह पोबारा केला होता. दरम्यान घटनास्थळी रिक्षातून आलेल्या तिघांच्या बरोबर वादावाद झाली. त्यातून हा खून करण्यात आला.
वादात रागाच्या भरात खून केल्याची कबुली :रिक्षा ढालेवाडीच्या दिशेने निघून गेल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी ढालेवाडी या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता, त्यांना त्या ठिकाणी मृत बाळासाहेब शिंदे यांच्या महिंद्रा गाडीला घासलेली रिक्षा आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी पोलिसांनी गतीने तपास करत अवघ्या दोन तासातच तिघांना अटक केली आहे. गाडी घासली म्हणून झालेल्या वादात रागाच्या भरात हा खून केल्याची कबुली दिली आहे.
हेही वाचा : Umesh Pal Murder Case: उमेश पाल हत्या प्रकरण.. बाहुबली अतिक अहमदच्या मुलासह पाच शूटर्सची माहिती देणाऱ्यांना मिळणार बक्षीस