सांगली- सांगलीत सुरू असणाऱ्या पावसामुळे पद्माळकडून सांगलीत आलेल्या नाल्याला पूर आल्यामुळे कर्नाळ रोड-जगदंबा कॉलनीतील पाच घरांना पाण्याचा वेढा बसला आहे. या ठिकाणच्या घरातील 22 जणांना बाहेर काढण्यात महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेला यश आले आहे. यामध्ये 2 महिने आणि 6 महिन्याच्या बाळासह बाळंतिणीचीसुद्धा अग्निशामक विभागाने सुटका केली आहे.
तब्बल 2 तास चालले बचाव कार्य
कर्नाळ रोडवरील जगदंबा कॉलनीतील नाल्याच्या पलीकडील आठ घरांना पाण्याने वेढा दिल्याची माहिती मिळताच महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे, सहायक आयुक्त सहदेव कावडे आणि अग्निशामक विभागाचे अग्निशमक अधिकारी चिंतामणी कांबळे आपल्या आपत्कालीन पथकासह त्याठिकाणी पोहोचले. कर्मचाऱ्यांनी धाव घेत बोटीद्वारे या अडकलेल्या लोकांची सुटका केली. यामध्ये वाहत्या नाल्यात बोटी घालून पालिकेच्या जवानांनी तसेच रॉयल बोट क्लबच्या आपत्ती मित्रांनी या पुराच्या पाण्यात सापडलेल्या दोन लहान बाळ आणि बाळंतिणीसह 22 जणांना तसेच सहा जनावरांना सुरक्षितपणे बाहेर काढले. 2 तास सुरू असणाऱ्या या बचाव कार्यात अडकलेल्या सर्व नागरिकांना काढण्यात यंत्रणेला यश आले आहे. यासाठी दोन यांत्रिक बोट आणि अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे, विजय पवार, सुनील माळी आणि कृष्णा रॉयल बोट क्लबचे दत्ता पाटील, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे अतिक्रमण विभागाचे विक्रम घाडगे व प्राणीमित्र मुस्तफा मुजावर अन्य जवानांच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले.
हेही वाचा -राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष प्रवेश सोहळे चुकीच्या पद्धतीने, काँग्रेस आमदार कदम यांची टीका