सांगली- कर भरा आणि सोन्याची दागिने बक्षीस मिळवा, अशी भन्नाट योजना सांगलीच्या वांगी ग्रामपंचायतीने सुरू केली आहे. 100 टक्के करवसुलीसाठी ग्रामपंचायतीने ही शक्कल लढवली असून 'करवसुली सुवर्ण बक्षीस योजना'असे याचे नाव आहे. आता या योजनेतून करदात्याला सोन्याची अंगठय़ा आणि कॉईन मिळणार आहे.
कोणताही कर वसूल करायचा म्हटले की ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका या संस्थांसमोर मोठे आव्हान असते. करबुडव्यांमुळे दरवर्षी थकीत प्रमाण वाढत असते. खरंतर या कराच्या माध्यमातून त्या गावांचा आणि शहरांचा विकास अवलंबून असतो. पण, 100 टक्के कर वसुली होत नसल्याने त्याचा विकासावर परिणाम झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. अनेक वेळा कर वसुलीसाठी व्याज, दंड माफ अशा सवलतीच्या योजना सुरू केल्या जातात. पण, त्याचा फारसा फायदा होत नाही. मात्र, सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील वांगी या ग्रामपंचायतीने यंदाच्या आर्थिक वर्षी 100 टक्के कर वसुलीसाठी करवसुली सुवर्ण बक्षीस योजनाही अफलातून आणि हटके योजना जाहीर केली आहे.
वांगी हे कडेगाव तालुक्यातील एक मोठे गाव असून त्याची लोकसंख्या ही नऊ हजारांच्या आसपास आहे. यामुळे गावच्या कराचा आकडा देखील मोठा आहे. गावची दरवर्षी एकूण 65 लाखांच्या आसपास ग्रामपंचायतींची करवसुली असते. गावात एकूण 2 हजार 600 मिळकतदार आहेत. पण, अनेकजण थकबाकी भरत नाही. जे कर भरत नाहीत, त्यांचे नळ कनेक्शन तोडणे, गाळे सील करणे, असे अनेक उपाय करूनही गावाची कर वसुली ही केवळ 30 टक्केच होते. याचा परिणाम गावाच्या विकासावर होतो.