सांगली -भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही मराठा समाजासह ओबीसींच्या मुळावर उठल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. राज्य सरकारमधील ओबीसी नेते हे नुसते बोलघेवडे आहेत. आरक्षणावर लोणावळ्यात बैठक घेण्यापेक्षा मंत्रालयात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावावा असे देखील त्यांनी म्हटले आहे. दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर 26 जून रोजी भाजपा आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ते सांगलीमध्ये बोलत होते.
पुढे बोलताना पडळकर म्हणाले की, राज्यात मराठा, ओबीसी, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही केंद्र स्थानी असून, फुले- शाहू- आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि त्यांच्या विचाराच्या समाजाच्या मुळावर उठायचे. शिवसेना आणि काँग्रेसच्या मदतीने राष्ट्रवादी हे काम करत आहे. जनतेला हे सर्व कळत आहे अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचे आंदोलन - पडळकर
माराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सगळ्यांची मागणी आहे, मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांना आरक्षण मिळावे. ही भाजपाची भूमिका आहे. त्यासाठी येत्या 26 तारखेला भाजप रस्त्यावर उतरणार आहे. माला वाटतं की मंत्र्यांनी लोणावळ्यात बैठक घेण्याऐवजी मंत्रालयात बैठक घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडावा असेही गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी कायमच गोपीचंद पडळकरांच्या निशाण्यावर
गोपीचंद पडळकर हे कायमच राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत असतात, यातून ते अनेकवेळा वादात देखील सापडले आहेत. गोपीचंद पडळकर यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्याविरोधात लढवली होती. त्यात त्यांचा पराभाव झाला. त्यानंतर त्यांना भाजपाकडून विधान परिषदेवर संधी देण्यात आली. भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून पडळकर यांनी राष्ट्रवादीविरोधात टीकेची झोड उठवली आहे. त्याचाच हा आढावा.
पडळकरांचा रोहित पवारांवर निशाणा
रविवारी घोंगडी बैठकीच्या निमित्ताने कर्जत जामखेड मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका करताना त्यांना पोस्टर बॉय म्हटले आहे. रोहित पवार हे स्वत:ला मुख्यमंत्री समजतात अशी टीका पडळकर यांनी पवारांवर केली. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी देखील पडळकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. पडळकर नेहमीच पवार कुटुंबावर टीका करत असल्यानेच भाजपाने त्यांना आमदारकी दिल्याचे त्यांनी म्हटले. महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळा सावळा गोंधळ असल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. एका खात्याचा निर्णय दुसराच मंत्री जाहीर करतो. मंत्र्याने एखादा निर्णय घेतला तर तो मित्र पक्षातील दुसऱ्या मंत्र्याला मान्य नसतो. राज्य सरकारचा असा कारभार राज्यातील जनतेने आजपर्यंत कधी अनुभवला नव्हता अशी टीका पडळकर यांनी केली आहे.