सांगली - महानगरपालिकेची ऑनलाईन सभा गुरुवारी पार पडली. मात्र, ऑफलाइन सभेच्या मागणीवरून ही सभा तहकूब करावी लागली. सत्ताधारी भाजपाचे भानगडीचे विषय ऑनलाइन सभेत मंजूर करण्यात येत असल्याचा आरोप करत विरोधाकांनी ऑफलाइन सभेची मागणी केली. 23 डिसेंबरपर्यंत सभा तहकूब करण्यात आली आहे.
तांत्रिक अडचणी आणि भानगडीचे विषय -
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची मासिक सभा गुरुवारी पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन महासभा भरवण्यात आली. मात्र, आता ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन सभा घेण्याची मागणी ऐरणीवर आली. महापौर गीता सुतार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या ऑनलाइन सभेत अनेक नगरसेवकांना सभेत विषय मांडताना तांत्रिक अडचणी आल्या. याशिवाय उपसूचनेद्वारे ऐनवेळी जागा भाड्याने देणे, ऑनलाइन सभेत घोटाळ्याचे विषय मांडणे, याव्यतिरिक्त भूखंड विक्रीचा डाव सुरू असल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला. तसेच सांगली जिल्हा परिषदेची सभा ऑफलाइन सुरू होण्याबाबत शासनाचे पत्र आले आहे. त्यामुळे थोड्याच दिवसात पालिकेलाही ऑफलाइन सभेसाठी पत्र येईल, असे मत काँग्रेस नगरसेवक संतोष पाटील यांनी व्यक्त केले.