महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"नको ती आठवण".. मन सुन्न करणारा ब्रम्हनाळमधील मृत्यूचा प्रवास.. - Krishna river flood

११ च्या सुमारास काही लोकांना सोडून बोट गावात परतली होती. यामध्ये लहान मुले, मोठ्या संख्येने महिला व वयोवृद्ध लोक बसले होते. पाण्याच्या प्रवाहाला छेदत बोटीचा प्रवास सुरू झाला. काही अंतरावर गेल्यावर अचानक बोटीचा पंख पाण्याखाली असणाऱ्या झुडपात अडकला व बोटीने हेलकावे घेणे सुरू केले. त्यानंतर बोटीत झालेल्या गोंधळामुळे बोट उलटली व सगळे जण पाण्यात बुडाले.

ब्रम्हनाळ
ब्रम्हनाळ

By

Published : Aug 12, 2020, 6:13 PM IST

सांगली- सांगलीत महापूर आला असताना ब्रह्मनाळ येथे बोट दुर्घटना घडली होती. या हृदयद्रावक घटनेला ८ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण झाला आहे. या घटनेत एकाच वेळी १७ जणांना कृष्णेच्या महापुरात जलसमाधी मिळाली होती. या वेदनादायक घटनेच्या आठवणी आजही ब्रह्मनाळकरांच्या मनात जिवंत आहे.

माहिती देताना पीडित

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात महापुराने जिल्ह्याला विळखा घातला होता. या महापुरात अनेकांचे संसार वाहून गेले होते. कुणाची शेती तर कुणाचा व्यवसाय पूर्णत: पाण्यात बुडाला होता. मात्र यात सगळ्यात मोठी हानी झाली ती जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावाची. तालुक्यातील कृष्णा नदीला महापूर आला होता. यात नदीकाठची गावे पुराच्या पाण्यात बुडाली. गावांमधील नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी आतोनात प्रयत्न करत होते. एनडीआरएफ, सामजिक संघटना, प्रशासन देखील नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी प्राण पणाला लावत होते. मात्र, प्रलयकारी महापुरासमोर यंत्रणा तोकडी पडली होती. त्यामुळे, गाव पातळीवर अनेक जण उपलब्ध असणाऱ्या बोटीतून नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न करत होते.

संपूर्ण गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. यावेळी ग्रामस्थांनी लाकडी बोटीच्या सहायाने स्वत:ला प्रलयातून बाहेर काढले होते. सकाळपासून गावातील ग्रामस्थांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. मात्र नागरिकांची संख्या खूप होती आणि प्रत्येक जण बोटीत बसण्यासाठी धडपडते होते. ११ च्या सुमारास काही लोकांना सोडून बोट गावात परतली होती. यामध्ये लहान मुले, मोठ्या संख्येने महिला व वयोवृद्ध लोक बसले होते. पाण्याच्या प्रवाहाला छेदत बोटीचा प्रवास सुरू झाला. काही अंतरावर गेल्यावर अचानक बोटीचा पंख पाण्याखाली असणाऱ्या झुडपात अडकला व बोटीने हेलकावे घेणे सुरू केले. त्यानंतर बोटीत झालेल्या गोंधळामुळे बोट उलटली व सगळे जण पाण्यात बुडाले.

ज्यांना पोहता येत होते त्यांनी स्वतःच्या जिवाबरोबर इतरांचाही जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण पाण्याच्या प्रवाहासमोर सर्वांना वाचवने अशक्य झाले. या दुर्घटनेत १७ जणांचा बुडून मृत्यू झाला होता. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळून गेले होते.

हृदय पिळवटून टाकणारे आजी-नातवाची मृत्यू मिठी

महापुराच्या तोंडातून आपला व आपल्या दीड महिन्याचा नातू यशराज याचा जीव वाचवण्यासाठी कस्तुरबाई वडेर बोटीत बसल्या होत्या. छातीला बिलगून चिमुकला यशराज आजीच्या कवेत होता. आणि बोटीत ज्या वेळी गोंधळ उडाला त्यावेळेस कस्तुरबाई यांनी आपल्या नातवाला मिठीत आणखी घट्ट केले. बोट बुडाल्यानंतर ज्या वेळी आजी-नातवाचा मृतदेह काठावर ठेवण्यात आला, त्यावेळी हे दृश्य पाहून सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. चिमुकल्या यशराजला मृत आजीने एका हाताने छातीला कवटाळून ठेवले होते. तसा यशराजसुद्धा आजीच्या मिठीत होता, पण मृत अवस्थेत. शेवटपर्यंत आजीने आपल्या नातवाला आपल्या कवेतून सोडले नव्हते. हे चित्र पाहून अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला होता.

महापुराने हिरावली कुटुंबे -

गावातील दीपक पाटील यांच्या अंगावर आजही त्या घटनेने शहारा येतो. पत्नी, मुलगी, सासू, काका आणि काकू, असे त्यांचे कुटुंब महापुराने हिरावून घेतले आहे. त्या दिवशी घडलेला प्रसंग सांगताना ते आजही भावूक होतात. गावात पाणी वाढत होते, मात्र २००५ मध्ये आलेल्या महापुरावरून आमच्या घरात पाणी येणार नाही, अशी आमची सगळ्यांची धारणा होती. तसे, आमचे घर ३ मजली आणि चढावर होते. त्यामुळे आम्ही सर्वजण २००५ मध्ये जेवढे पाणी आले होते, तेवढे येईल, अशा मनस्थितीत होतो. त्यामुळे, आम्ही घर न सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र पाणी जस जसे वाढू लागले, तसे आसपास असणारे सगळे जण गावातून बाहेर पडू लागले होते आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने ऐनवेळी आम्ही सगळे गावातून बाहेर पडलो. बोटीच्या ठिकाणी पोहोचलो, त्यावेळी बोटीत बसण्यासाठी गर्दी होत होती. माझी पत्नी, मुलगी, सासू, काका आणि काकू त्या बोटीत बसल्या आणि सगळे काही संपले. आजही पाऊस सुरू झाला की पुराचे पाणी वाढू लागताच त्या घटनेच्या आठवणीने अंगावर शहारा येतो, असे दीपक पाटील सांगतात.

दुर्घटनेला प्रशासना कारणीभूत?

गावात पुराचा विळखा पडत होता, त्यावेळी स्थानिक ग्रामस्थ नेत्यांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले होते, असा आरोप ग्रामस्थ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी त्यावेळी केला होता. तर माजी खासदार राजू शेट्टी यांच्याबरोबर अनेक नेत्यांनीसुद्धा याबाबत प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढत, याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर या मतदारसंघाचे आमदार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनीसुद्धा या प्रकरणाची चौकशी करण्याची ग्वाही दिली होती. मात्र या चौकशीचे केवळ सोपस्कर पार पाडत बासनात गुंडाळून ठेवण्याचा प्रकार झाला आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेला एक वर्ष झाला आहे. या दिवसाच्या निमित्ताने ब्रम्हनाळकरांनी बोट दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आणि नको त्या आठवणी, नको तो महापूर, अशी भावना व्यक्त केली. पण तो काळा दिवस ब्रम्हनाळकरांच्या मनात कायम घर करून असणार, हे मात्र नक्की.

हेही वाचा-वसंतदादा साखर कारखाना उभारणार 100 खाटांचे कोविड सेंटर; विशाल पाटलांची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details