सांगली- जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने जात असल्याची दिलासादायक बातमी मिळत असताना मुंबईस्थित वाळव्याच्या रेठरेधरण येथील व्यक्तीला कोरोना लागन झाल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित कोरोना रुग्णावर मुंबईत उपचार सुरू असून प्रशासनाने खबरदारी म्हणून रेठरेधरण गाव सील करत संबंधित रुग्णाच्या संपर्कातील २५ जणांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल केले आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णाचे सांगलीतील गाव सील, कुटुंबासह २५ जणांची आयसोलेशन कक्षात रवानगी - niraj corona news
मुंबईस्थित वाळव्याच्या रेठरेधरण येथील व्यक्तीला कोरोना लागन झाल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित कोरोना रुग्णावर मुंबईत उपचार सुरू आहेत.
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील रेठरे धरण येथील ६५ वर्षीय व्यक्ती हे मुंबई मध्ये एका बॅंकेत नोकरीस आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असताना, कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सदर कोरोना बाधित रुग्ण हे २० मार्च रोजी मुंबईहूनआपल्या गावी रेठरे धरण येथे आले होते. २० दिवस वास्तव्यास असताना ,१० एप्रिल रोजी अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना मुंबई येथे नियमित उपचार सुरू असलेल्या अपोलो रुग्णालयात रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांना कोरोना लक्षण आढळल्याने त्यांचे स्वॅब घेण्यात आले, ज्यामध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह आल्याची गोष्ट समोर आली. यानंतर याबाबत प्रशासनाला याची माहिती मिळताच संपूर्ण प्रशासनाने रेठरे धरण गाठत संपूर्ण गाव सीलबंद केले आहे. तसेच अन्य उपयोजना सुरू करत संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील पाच जणांसह संपर्कातील सुमारे २५ जणांना कोरोना रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांचे सोमवारी स्वॅब घेण्यात येणार असून त्यांनतर पुढील उपयोजना करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय साळुंखे यांनी सांगितले आहे.