सांगली- चांदोली धरणग्रस्तांच्या ( Chandoli Dam ) विविध मागण्या आणि जमीन आणि गाळे वाटपमध्ये झालेल्या ( Shop Allotment Scam ) भ्रष्टाचार प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणग्रस्तांनी धरणे आंदोलन केले ( Dam Affected Agitation In Front Of Sangli Collector Office ) आहे. क्रांतिसिंह नागनाथअण्णा नायकवडी यांचे नातू गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांनी हे आंदोलन करत मागण्यांची दखल तातडीने घ्यावी, अन्यथा शासनाला महागात पडेल, असा गर्भित इशारा दिला.
धरणग्रस्तांचे धरणे आंदोलन -
सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातल्या धरणग्रस्तांच्या विविध मागण्या आजही शासन दरबारी प्रलंबित आहेत. सांगली जिल्ह्यातल्या चांदोली धरणग्रस्तांच्या जमीन आणि गाळे वाटपामध्ये दोन कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप धरणग्रस्तांच्यावतीने करण्यात आला आहे. स्थानिक अधिकारी पदाधिकारी आणि काही राजकीय नेत्यांच्या संगनमताने हा सर्व प्रकार करण्यात आल्याचा आरोप धरणग्रस्तांचे नेते गौरव नायकवडी यांनी केला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी आणि संबंधित यांच्यावर कारवाई करावी, त्याचबरोबर धरणग्रस्तांची विविध प्रश्न तातडीने सोडवण्यात यावे, या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणग्रस्तांच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये चांदोली धरणग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.