सांगली - जिल्ह्यात आणखी दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आले आहेत. मुंबई व दिल्लीवरून आलेल्या शिराळा आणि खानापूर तालुक्यातील दोघांना कोरोना लागण झाली आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. मंगळवारी दिवसभरात ३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता २३ वर पोहचली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
मुंबई, दिल्लीवरुन परतलेल्या दोघांना कोरोनाची लागण, जिल्ह्यातील बाधितांची संख्या २३ च्या घरात - corona latest news update sangli
जिल्ह्यात आणखी दोनजण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. यात मुंबईहून शिराळा तालुक्यात आलेल्या ४२ वर्षीय महिला आणि दिल्लीवरुन खानापूर तालुक्यात आलेला ५५ वर्षीय पुरुषाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढत असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मंगळवारी जिल्ह्यात आणखी ३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईहुन शिराळा तालुक्यातील रेड येथे आलेल्या ४२ वर्षीय महिलेला कोरोना लागण झाली आहे. १७ मे रोजी सदर महिला मुंबईवरून शिराळा तालुक्यातील रेड या गावी आली होती. या महिलेस आरोग्य यंत्रणेकडून होम क्वारंटाईन करण्यात आले होते. सोमवारी या महिलेमध्ये कोरोनाची लक्षण दिसून आल्यानंतर मिरज कोरोना रुग्णालयात दाखल करत कोरोना चाचणी घेण्यात आली होती. मंगळवारी रात्री उशिरा या चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे.
तसेच दिल्लीवरून खानापूर तालुक्यातील बलवडी येथे आलेल्या एका ५५ वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली आहे. १५ मे रोजी सदर व्यक्ती हा दिल्लीहून बलवडी या गावी आला होता. त्यानंतर प्रशासनाने त्यास होम क्वारंटाईन केले होते. मात्र सोमवारी कोरोनाची लक्षणे उद्भवल्याने मिरज आयसोलेशन कक्षात दाखल करत कोरोना चाचणी घेण्यात आली होती. मंगळवारी रात्री उशिरा सदर व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. तर, प्रशासनाकडून दोन्ही कोरोना बाधितांच्या निकटवर्तीयांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू असून अनुषांगिक उपाययोजना करण्यात येत आहेत. मंगळवारी दिवसभरात ३ नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही २३ वर पोहचली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.