सांगली :श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे । क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ।। या कविता ऐकून आपण मोठे झालो. श्रावणात ( Month of Shravan ) सर्व सणांची सुरुवात नागपंचमीपासून होते. महाराष्ट्रातील सांगली येथील बत्तीस शिराळा ( Battis Shirala Village in Sangli ) हे गाव जिवंत नागांच्या पूजेसाठी ( Worshiping Living Snakes ) नेहमीच ओळखले जाते. न्यायालयाच्या निर्बंधानंतर या ठिकाणी जिवंत नागांच्या ऐवजी प्रतीकात्मक नागांची पूजा केली जाते. मात्र, गावात साप दिसला तर त्याला न मारता नमस्कार घातला जातो. या गावात शेकडो वर्षांपूर्वी जिवंत नागांच्या पूजेला सुरुवात झाली. याबाबत आख्यायिकादेखील आहे. पण, आज न्यायालयाच्या निर्णयानुसार नागपंचमी साजरी करावी लागत असल्याने, पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी करण्याची परवानगीची मागणी प्रत्येक शिराळकर करतो.
नागाचे गाव म्हणून शिराळ्याची जगभर प्रसिद्धी : महाराष्ट्रात नव्हे तर देशात सांगलीच्या 32 शिराळ्याची एक वेगळी ओळख आहे. नागांचे गाव म्हणून शिराळ्याची प्रसिद्धी जगभर आहे. शिराळा गावामध्ये नागाला नेहमीच पूज्य मानले जाते. गावातील प्रत्येक घरात नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा होते. आता ती प्रतीकात्मक स्वरूपात होते. मात्र, या गावात जिवंत नागांची पूजा करण्याची एक प्रथा होती. घरोघरी नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाची पूजा केली जात असे. त्यामुळे शिराळा नगरीत नागपंचमीच्या दिवशी घरोघरी नागराजाचे वास्तव्य असायचे. प्रत्येक महिला नागराजाला भाऊ मानून, त्याच्यासाठी उपवास करते आणि नागपूजेनंतर उपवास सोडतात.
शिराळा गावाचा ऐतिहासिक वारसा : शिराळ गावात नागपंचमीच्या दिवशी होणाऱ्या जिवंत नावाच्या पूजेमुळे शिराळा हे जग प्रसिद्ध आहे. पण, या जिवंत नागांच्या पूजेलादेखील ऐतिहासिक वारसा आहे. शिराळा गावात आलेल्या गोरक्षनाथ महाराजांनी आपल्या चमत्कारातून नाग प्रकट केला. त्यानंतर घरोघरी नागांची पूजा होऊ लागली. गावातील महाजन कुटुंबाच्या दारामध्ये गोरक्षनाथ महाराज भिक्षा मागणीसाठी पोहोचले होते. तो दिवस नागपंचमीचा होता. दारात पोहचलेल्या गोरक्षनाथ महाराजांनी दीक्षा मागण्यासाठी अनेक वेळा हाक दिली. मात्र, आतून कोणीच लवकर आले नाही.