सांगली : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या ( Karnataka Chief Minister Basavaraj Bomaiah ) यांनी सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील 42 गावे कर्नाटकमध्ये येणार असल्याचे विधान केले. यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. विशेषता कर्नाटक मधूनही यांच्या विधानानंतर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
कोणतेही गाव कर्नाटकमध्ये जाणार नाही - जत तालुक्यातून कोणतेही गाव कर्नाटकमध्ये जाणार नसल्याचे सर्व नेत्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, काँग्रेस आमदार विक्रम सावंत आणि जत तालुक्याचे भाजप माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह स्थानिक नेत्यांनी जत तालुक्यातील कोणतेही गाव कर्नाटक मध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या ठरावावरून वाद - जत तालुक्यामध्ये पहिल्यांदा भाजपचे आमदार म्हणून निवडून आलेले आणि सध्या मिरज तालुक्याचे आमदार व राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमया यांच्या विधानाचे खंडन केले आहे. मंत्री खाडे म्हणाले की, बसवराज यांनी नेमके हे विधान का केले आहे हे त्यांना विचारावे लागेल. पण जत तालुक्यातील गावांनी कर्नाटकमध्ये जाण्याचा जो ठराव केला होता, तो खूप जुना आहे. 2013-14 साली याबाबतचा ठराव झाला होता. मात्र त्यावेळी त्यांची मागणी हे पाणी मिळण्यासाठी होती म्हणून त्यासाठी तो ठराव करण्यात आला होता. आता बराच वेळ आणि काळ गेला आहे. तर त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जाण्याच्या बाबतीत इशारा दिला होता,ठराव केला होता,पण त्या ठिकाणी पाणी देण्यासाठी म्हैसाळ विस्तारित योजना सुरू केली, त्याला निधी देखील दिला आहे. जवळपास 60% क्षेत्र पाण्याखाली आलेला आहे. आता 40 टक्के क्षेत्राचा बाकी आहे आणि त्या ठिकाणी ते पाणी देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात, त्यामुळे लवकरच 42 गावांना पाणी मिळेल.
कुणीही कर्नाटकमध्ये जाण्यास तयार नाही - मंत्री खाडे म्हणाले की, जत तालुक्याचे आपण दहा वर्ष आमदार म्हणून काम केले आहे. त्यामुळे आता देखील या गावातले लोकांशी संपर्क आहे. सकाळपासून आपण अनेक गावातल्या लोकांशी चर्चा करतोय आणि कुणीही कर्नाटकमध्ये जाण्याबाबत तयार नाही. त्यामुळे कुणीही कर्नाटकमध्ये जाण्यास तयार नसतील तर गावे उचलुन नेणार आहेत का ? असा सवाल करत तरी देखील या प्रश्नांवर जत तालुक्यात आज तातडीने जाऊन सर्वपक्षीय बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी स्पष्ट केले आहे.
भाजप आमदाराचा सरकारला घरचा आहेर - तर भाजपाचे जतचे माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी केलेले विधान हास्यस्पद असून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहे. कोणताही ठराव सध्या झाला नाही, त्यामुळे कर्नाटक मध्ये जाण्याचा प्रश्न येत नाही,असा टोला भाजपचे जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी लगावला आहे. त्याचबरोबर जत तालुक्यातल्या म्हैशाळचा पूर्व टप्पा अजूनही महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित केलेला नाही,तो अजूनही रखडलेला आहे त्यामुळे तो पूर्ण करावा,असा घरचा आहेर विलासराव जगताप यांनी भाजपा सरकारला दिला आहे.
42 गावांचा पाण्याचा प्रश्न - काँग्रेसचे जत तालुक्याचे आमदार विक्रम सावंत म्हणाले की, 42 गावांनी पाणी द्या नसेल तर कर्नाटकमध्ये जाण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. त्याबाबतचा ठराव केला होता, त्या मागची भावना केवळ पाणी मिळावे ही होती. पण जो ठराव करण्यात आला त्याचे प्रत्यक्षात ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद या ठिकाणी नोंद नाही. तर जत तालुक्यातल्या 42 गावांचा पाण्याचा प्रश्न हा सुटलेला नाही,यातल्या बऱ्याच गावांना गेल्या 3 वर्षांपासून कर्नाटक राज्यातील तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी मिळत आहे. त्यामुळे म्हैसाळ विस्तारीत योजना पूर्ण होण्यासाठी लागणार कालावधी पाहता,तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी मिळाले पाहिजे,अशी मागणी आमदार विक्रम सावंत यांनी केले आहे.