सांगली -केंद्र अथवा राज्य सरकारने राज्याची कोणत्याही प्रकारची विभागणी केलेली नाही. प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची असलेली संख्या यानुसार महाराष्ट्राची जिल्हानिहाय रेड, ऑरेंज, ग्रीन या तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार असल्याची बातमी साफ खोटी आहे. पुढील आठवड्याभरात राज्यातील आरोग्य अधिकारी आणि संबंधीत घटकांसोबत चर्चा करुन सरकार योग्य तो निर्णय घेईल. तसेच 30 एप्रिलपर्यंत राज्यात सरसकट लॉकडाऊन असणार आहे, असे राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे. आज सांगलीतील शिवभोजन थाळी केंद्रांना विश्वजीत कदम यांनी भेटी दिल्या त्यावेळी ते बोलत होते.
कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची प्रतिक्रिया... हेही वाचा....#coronavirus : राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; राज्याची विभागणी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये
महाराष्ट्रात तीन झोन बनवण्यात आले हे साफ खोटे...
सांगली, मुंबई, पुणे, पालघर, औरंगाबाद यांसह अन्य जिल्हे रेड झोनमध्ये गेलेले नसून तसा निर्णय अद्याप झालेला नाही. केंद्र अथवा राज्य सरकारने असे कोणतेही झोन घोषीत केलेले नाहीत. पुढील आठवड्यात यासंदर्भात केंद्र सरकारच्या परवानगीने निर्णय होईल. झोनिंगच्या बाबतीत प्रत्येक राज्य सरकारने आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन केंद्र सरकारची परवानगी घेऊन तो निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र 30 एप्रिलपर्यंत सरसकट लॉकडाऊन असणार आहे, असे विश्वजित कदम यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटील-चंद्रकांत पाटील यांच्या वादात विश्वजीत कदमांची उडी...
'जो शिशों के घरो मे रहते है, वो दुसरोंके घरो पे पत्थर फेका नही करते' अशा शब्दात कॉंग्रेस आमदार आणि मंत्री विश्वजित कदम यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात सुरु असेलल्या वाक् युद्धात विश्वजीत कदमांनी उडी घेतली आहे. तसेच महापुराच्या काळात भाजप नेत्यांनी जनतेला काय मदत केली, हे सर्वांना माहीत आहे. चंद्रकांतदादा यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. कोरोनाच्या संकटात कोणीही राजकारण करु नये. आता सर्वांनी एकत्रित काम करण्याची वेळ आहे, असे आवाहनही विश्वजित कदम यांनी केले आहे.
हेही वाचा..."चंद्रकांत दादा काळजी घ्या ! कोरोना आजाराचा धोका साठीच्या वरील लोकांना अधिक"
मंत्री विश्वजीत कदम यांनी शिवभोजन केंद्रांना दिली भेट...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून गोर-गरिबांना शिवभोजन थाळीच्या माध्यमातून जेवण पुरवण्याचे काम सुरू आहे. सरकारच्या या निर्णयाला लोकांचे समर्थन आणि गरजू नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याबाबत सांगली जिल्ह्यात सुरु असणाऱ्या विविध ठिकाणच्या शिवभोजन केंद्रांना कृषी आणि सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सदर ठिकाणच्या केंद्र चालकांसोबत चर्चा केली आणि अन्न वाटप कामकाजाचा आढावा घेतला. तसेच शिवभोजन केंद्र चालकांना गोरगरीब जनतेला दररोज अन्न मिळेल, असे काम करण्याच्या सूचना कदम यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा....जनतेचा सलाम ! एकाचा मृत्यू तर दुसरा मुलगा व्हेंटिलेटर; तरीही पोलीस कर्मचारी कर्तव्यावर रुजू