सांगली - राज्यातील पूर परिस्थितीचे राजकारण कोणी करू नये, विरोधकांनी सूचना कराव्यात, त्या पूर्ण केल्या जातील, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात येत आहे. तसेच सध्या निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण यंत्रणा सक्षम केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थितीच्या पाहणी वेळी ते बोलत होते.
सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगलीमध्ये येऊन आढावा घेतला. शहरातील हिराबाग येथे लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून पुरात अडकलेल्या नागरिकांना देण्यात येणारी मदत, पुरातून बाहेर काढण्यात येत असल्याबाबत माहिती घेतली, त्यानंतर कच्ची भवन या ठिकाणी पूरग्रस्तांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला.
पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या शंभर वर्षात इतका पाऊस पडला नाही, तो नऊ दिवसात पडला आहे. त्यामुळे ही महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. 3 पट इतक्या पावसाची नोंद, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाली आहे. त्यामुळे ही परिस्थिती गंभीर बनली. या सर्व पार्श्वभूमीवर प्राप्त परिस्थितीशी प्रशासन लढत आहे. नौदल, लष्कर, एनडीआरएफ आणि सामाजिक कार्यकर्त्यांना घेऊन पूरग्रस्तांना बाहेर काढणे, त्यांना मदत पोहचवणे युद्धपातळीवर सुरू आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 93 बोटीसह नौदल, लष्कर, एनडीआरएफ काम करीत आहेत. नौदलाची आणखी 15 पथके आज संध्याकाळपर्यंत सांगली जिल्ह्यात दाखल होणार आहेत. पूरग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठाम असून सर्व प्रकारची मदत आताही आणि पूर ओसरल्यानंतरही केली जाईल, रोख स्वरूपात अनुदानही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक पूरग्रस्तांना मदत मिळणार आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्या सेल्फीचा प्रकार तसेच इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्याकडून पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीवर करण्यात येणाऱ्या पोस्टरबाजीबाबत त्यांनी वक्तव्य केले. मदतीवर महाराष्ट्र शासनाचे पोस्टर असले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट करत. विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवर बोलताना अशा परिस्थितीत आता राजकारण सुरू झाले आहे. मात्र, पूरस्थितीशी सामना करताना पूरग्रस्तांना दिलासा देणे गरजेचे आहे, राजकारण इतर वेळी होऊ शकते, विरोधकांनी सूचना जरूर कराव्यात, त्यामध्ये जरूर सुधारणा केली जाईल, सध्या पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे आणि दिलासा देणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.