सांगली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात लसीकरण मोहीमेचा वेग वाढवण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 1 लाख 60 हजार व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आता 227 केंद्रांच्या माध्यमातून लसीकरणाची मोहीम सुरू होणार आहे. तसेच जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे लॉकडाऊन करण्याचे नियोजन नसल्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरी लाटेसाठी प्रशासन सज्ज -
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व जिल्हा प्रशासनाला दक्ष राहण्याच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत. सांगली जिल्हा प्रशासनाने ही कोरोनाची दुसरी लाट गृहीत धरून सर्व तयारी सुरू केलेली आहे. कोरोना रूग्णालयातील बेडची उपलब्धता याशिवाय खासगी रुग्णालयात खाटा राखीव ठेवणे, अशा अनेक पातळ्यांवर प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे.
माहिती देताना जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी.. लसीकरणाचा वाढणार वेग -
जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत जवळपास 1 लाख 60 हजार व्यक्तींचे लसीकरण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे. आता पर्यंत 111 शासकीय व खासगी लसीकरण केंद्राच्या माध्यमातून लसीकरण करण्यात आले. शासनाने आता 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील व्यक्तींनादेखील लस देण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आता नव्याने 116 उपकेंद्रांच्या माध्यमातून लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात जवळपास 6 लाख 50 हजार इतकी संख्या 45 वर्षावरील वयोगटातील आहे. साधारणपणे एका महिन्यात यासर्वांना पहिला डोस पूर्ण करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले. लसीमुळे कोणतेही दुष्परीणाण होत नसल्याने नागरिकांनी लसीकरण करवून घ्यावे, असे आवाहन अभिजित चौधरी यांनी केले आहे.
लॉकडाऊन नाही पण..
गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन लागू होणार अशी चर्चा आणि अफवा सुरू आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या आदेशाप्रमाणे कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र लॉकडाऊन करण्याबाबत कोणतेही नियोजन प्रशासनाने केले नसून अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी केले आहे.
हेही वाचा -राज्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन, लोकसंख्येची घनता जास्त असल्याने राज्याला फटका -डॉ. संजय ओक