इस्लामपूर :जयंतराव, कृपाकरून कोरोनाबाधितांच्या जीवाशी खेळू नका, कुरघोडीचे राजकारण थांबवा. फारतर स्वतः आमच्या हॉस्पिटलला भेट द्या, वाटलं तर परवानगी द्या; अन्यथा आमची तक्रार नाही. मात्र कोरोनाबाधितांना योग्य उपचाराअभावी मरू देऊ नका, अशी कळकळीची विनंती नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केली आहे.
कोरोना रुग्णांसाठी आवश्यक सर्व सुविधा एकाच छताखाली असताना आणि बेड्स उपलब्ध असतानाही जिल्हा प्रशासनावर दबाव आणून 'प्रकाश'मध्ये मान्यता मिळू दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी आज मंगळवारी इस्लामपूर येथे पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले, 'जयंत पाटील खुनशीपणाने कोरोनाच्या महामारीतही राजकारण करत आहेत. आजपर्यंतचे सर्वात निष्क्रिय पालकमंत्री म्हणून त्यांचे काम सुरू आहे. इस्लामपूर शहरात आणि वाळवा तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ऑक्सिजनअभावी रुग्ण तडफडून मरत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री, मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून जयंत पाटील यांनी काय केले? हे जाहीर करावे. मागच्या लाटेतही त्यांनी एक रुपया मिळवून दिला नाही. इस्लामपूर आणि आष्ट्यात सध्या जे कोविड हॉस्पिटल आहेत ते मध्यवर्ती भागात आहेत. त्याचा स्थानिकांना मोठा त्रास होतो. रुग्णांमुळे नातेवाईक आणि नागरिकांना त्याचा संसर्ग होऊ शकतो याकडे जयंतरावांचे लक्षच नाही. ज्यांची इच्छा नाही त्यांच्यावर जबरदस्तीने कोविड सेंटर लादत आहेत. आमच्याकडे ६५० बेड्ससाठी ऑक्सिजनची व्यवस्था व अन्य सुविधा असताना व प्रशासनाची तयारी असतानाही 'प्रकाश हॉस्पिटल'ला मान्यता मिळू दिली जात नाही. आजअखेर वारंवार पाठपुरावा करूनही केवळ १७५ बेड्सलाच परवानगी दिली. एकीकडे उपचाराअभवी रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. तर दुसरीकडे सुविधा असणाऱ्या रुग्णालयांना परवानगी मिळू दिली जात नाही, हे दुर्दैवी आहे. सुविधांपासून कोविड रुग्णांना वंचित ठेवणारी ही प्रवृत्ती समूळ नष्ट करण्याची गरज आहे. शासनाकडून जिल्ह्यासाठी जे व्हेंटिलेटर आले, त्यातील एकही आम्हाला मिळू दिला नाही. ६५० रुग्णांची व्यवस्था असताना मंजूर क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण असतील तर त्यांना डिस्चार्ज द्या, असे सांगितले जाते, हा कुठला न्याय? त्यांनी कुठे जायचे? जयंतराव त्यांची सोय तुम्ही करणार का?असा सवाल ही यावेळी करण्यात आला.
'पालकमंत्री, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी स्वतः आमच्या हॉस्पिटलला भेट द्यावी. इथल्या सुविधा पाहून त्यांचे समाधान झाले तरच त्यांनी परवानगी द्यावी, ही त्यांना कळकळीची विनंती आहे. त्यांचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कारखानदारांनी कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश देऊनही प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या जयंत पाटील यांनी काय केले? चार कारखाने असूनही एकही बेड उपलब्ध करून दिला नाही. स्वतः करायचे नाही आणि जो करतोय त्याच्या द्वेषातून राजकारण आणून त्यालाही करू द्यायचे नाही, हे बरोबर नाही. सात वेळा आमदार, मंत्री असूनही आपण मतदारसंघासाठी काय केले? रेमडेसिवीर इंजेक्शन जाणीवपूर्वक मिळू दिले जात नाही. कृपा करून शनिवारी-रविवारी पाहुण्यासारखे न येता जिल्ह्यात तळ ठोकून बसा आणि रुग्णांचे प्राण वाचवा. लसीकरणाची व्यवस्था अपुरी आहे, त्याचे नियोजन लावा. अन्यथा आम्ही राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्याकडे न्याय मागू, तिथेही न्याय मिळालाच नाही तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागू. भाजपने कोरोनाच्या संकटात सातत्याने मदतीची भूमिका घेतली आहे, आम्हालाही सांगाल ती मदत करायला आम्ही तयार आहोत.'असे सांगताना निशिकांत पाटील म्हणाले मी स्वतः जयंतरावांना फोन केले, राजकारण व वैयक्तिक राग बाजूला ठेवून मी स्वतः जयंत पाटील यांना ३ वेळा फोन, मेसेज केले. परंतु त्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही. ही वेळ सर्वांनी मिळून कोरोनाच्याविरोधात लढण्याची आहे, राजकारण करण्याची नाही, असेही निशिकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.