सांगली - पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृष्णाकाठी नेदरलँडच्या 'हायस्पीड बोटी' दाखल झाल्या आहेत. सात आधुनिक बोटींचा लोकार्पण सोहळा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पार पडला. डॉ. पतंगराव कदम आपत्ती निवारण निधीमधून या बोटी पलूस तालुक्यात देण्यात आल्या आहेत.
सांगलीतील बोटींबद्दल माहिती देताना कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम सांगली जिल्ह्यामध्ये गतवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये महापूर आला होता. त्या महापुरात पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे ग्रामस्थांचे जीव वाचवताना मोठी दुर्घटना घडली होती. ज्यामध्ये 17 जणांना जलसमाधी मिळाली. त्या पार्श्वभूमीवर कृष्णाकाठी बोटींची सज्जता प्रशासकीय पातळीवर करण्यात येत आहे. सध्या सांगली जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याने अशा परिस्थितीत पलूस तालुक्यातील कृष्णा नदी काठच्या सात गावांना अत्याधुनिक आणि चांगला वेग असलेल्या बोटी मिळाल्या आहेत. डॉ.पतंगराव कदम आपत्ती निवारण निधीमधून या बोटी खरेदी करण्यात आल्या आहेत. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी नेदरलँडमधून या बोटी खरेदी केल्या आहेत.
हेही वाचा -चांदोली धरणावर अतिवृष्टी, सकाळपासून विसर्ग सुरू
सोमवारी या यांत्रिक बोटी कृष्णा नदी काठच्या गावांना देण्यात आल्या. जलसंपदा व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. पलूस तालुक्यातील औदुंबरमधील दत्त मंदिर परिसरात हा कार्यक्रम पार पडला. या बोटींमुळे पाण्याचा वेग जास्त असला तरी कमी वेळात अधिक लोकांना संकटसमयी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले जाऊ शकते. यावेळी जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासोबत या बोटींमध्ये बसून कृष्णा नदी पात्रात चाचणी केली.
हेही वाचा -सांगलीच्या कर्नाळ रस्त्यावर पाणी, वाहतूक बायपासमार्गे वळवली
२०१९ च्या महापुरात ब्रह्मनाळ गावात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत अनेकजण मृत पावले होते. भविष्यात अशी दुर्घटना घडू नये, या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अत्याधुनिक पध्दतीच्या बोटी नदी काठच्या गावांना देण्यात आल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री व पलूस मतदारसंघाचे आमदार विश्वजित कदम यांनी सांगितले.