सांगली - महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी अनेक कायदे आहेत. मात्र, कितीही कायदे केले तरी, जोपर्यंत समाजाची महिलांप्रति नकारात्मक मानसिकता बदलत नाही तोपर्यंत अत्याचार थांबणार नाहीत, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून आज (4 जानेवारी) 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींचा जनसुनावणी कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी रहाटकर बोलत होत्या.
केंद्र सरकारच्या वतीने राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून सुरू झालेल्या 'सखी वन स्टॉप सेंटर'च्या कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन विजया रहाटकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना रहाटकर म्हणाल्या, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी 'सखी वन स्टॉप सेंटर' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आज देशात 500हून अधिक सेंटर सुरू झाले असून 1 हजार सेंटरचे उद्देश्य ठेवण्यात आले आहे. या सेंटरच्या माध्यमातून अत्याचार पीडित महिलेसाठी एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून तिला न्याय देण्यात येणार आहे"