सांगली - पेट्रोल व डीझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर "गाडी ढकलो" मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आल. केंद्र सरकारने इंधन दरवाढ मागे घेतली नाही, तर जन आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
पेट्रोल व डीझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचा "गाडी ढकलो"मोर्चा. गाड्या ढकलत दरवाढीचा केला निषेध -
गेल्या काही महिन्यांपासून इंधनाचे दर वाढत आहेत. केंद्र सरकारच्या वतीने नुकतेच पेट्रोल आणि डिझेल दरात आणखी वाढ करण्यात आली. या दरवाढीच्या निषेधार्थ सांगलीमध्ये आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. केंद्राच्या दरवाढीचा विरोध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली अनोखा आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर थेट "दुचाकी ढकल" मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारच्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल गाड्यांमध्ये घालणे मुश्किल बनले आहे. सरकारच्या या धोरणामुळे आता गाडया ढकलण्याशिवाय पर्याय उरला नाही,असे मत व्यक्त करत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत इंधनदरावढीचा निषेध करण्यात आला.
अन्यथा दरवाढी विरोधात जनआंदोलन -
यावेळी राहुल पवार म्हणाले की,कोरोनाच्या संकटातून कसे सावरायचे याचे उत्तर लोकांना सापडत नाही आहे. उद्योग व्यवसाय पूर्वपदावर आलेले नाहीत. यातच आत्ता प्रत्येक दिवशी पेट्रोल व डीझेलची दरवाढ केली जात आहे. भाजप सरकारला सर्वसामान्य लोकांना त्रास देण्यात सुख वाटत आहे. कोरोनामुळे देश आर्थिक संकटात आहे. मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचे रोजगार गेले असून इंधन दरवाढीने दुहेरी संकटाचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत आहे. या अन्यायकारक पेट्रोल,डीझेल दरवाढीच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ आम्ही राष्ट्रवादी युवकच्या वतीने गाडी ढकल आंदोलन करत आहोत. लवकरात लवकर ही अन्यायकारक पेट्रोल डीझेलची दरवाढ मागे नाही घेतली तर आम्ही राष्ट्रवादी युवकच्या वतीने मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभा करू,असा इशारा यावेळी पवार यांनी दिला.