सांगली - आबांच्या पुण्याईमुळे आम्ही सत्तेत आलो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. सांगलीतील तासगावच्या अंजनी येथे आज आर. आर. पाटील यांचा पुण्यस्मरण दिन कार्यक्रम पार पडला, यावेळी आबांच्या स्मारकासाठी लवकरच अधिकचा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते व माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची पाचवी पुण्यतिथी आज साजरी करण्यात आली. अंजनी या आबांच्या गावात पुण्यस्मरण दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्यासह आमदार सुमनताई आर. आर. पाटील व आबा कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना उपस्थित नेत्यांनी आर. आर. पाटील यांच्या बद्दल आपले मनोगत व्यक्त करत आबांच्या आठवणींना उजाळा दिला.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बोलताना, विरोधी पक्षात असताना आर. आर. आबांनी सरकारला सळो की पळो करून सोडले होते, विधानसभेमध्ये आबांनी त्या वेळच्या सरकार विरोधात खुमासदार भाषण केले. तसेच आबा आक्रमक होते आणि सरकार विरोधात बोलत होते, त्यामुळे सरकार पुन्हा सत्तेवर बसेल, असे वाटत नव्हते. तसेच आर. आर. आबांमुळे राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये मोठा पक्ष झाला. मात्र, आज आबा जरी नसले तरी अजित दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष मोठा होतोय, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.