सांगली -महापालिकेतील सत्ताधारी भाजपाकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे आणि या भ्रष्टाचारामुळे भाजपा नाहक बदनाम होत आहे. त्यामुळे स्थानिक सत्ताधाऱ्यांना सुबुद्धी देवो या मागणीसाठी नागरिक हक्क संघटनेकडून थेट प्रभू रामचंद्रांना साकडे घालत आंदोलन करण्यात आले आहे.
"हे प्रभू रामचंद्र", स्थानिक भाजपाला सद्बुद्धी दे; नागरिक हक्क संघटनेचे आंदोलन प्रभू राम सत्ताधाऱ्यांना सदबुद्धी दे -
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून या ठिकाणी भाजपाकडून कारभार सुरू आहे. कारभार सुरू असताना अनेक गैरप्रकार झाल्याचे समोर आलेले आहेत आणि स्थानिक सत्ताधारी भाजपा प्रशासनाच्या भ्रष्टाचारामुळे पालिका क्षेत्रात आणि राज्यात भाजपा नाहक बदनाम होत आहे, असा आरोप करत नागरी हक्क संघटनेकडून सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वि.द.बर्वे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक भाजपा कारभाऱ्यांना सदबुद्धी देवो, असे साकडे प्रभू रामचंद्र यांना घालण्यात आले आहेत.
राम मंदिरासमोर स्थानिक भाजपाविरोधात यावेळी धरणे आंदोलन करत महापालिकेच्या सत्ताधारी भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच महापालिका बरखास्त करावी,अशी मागणी यावेळी नागरिकांच्या संघटनेकडून करण्यात आली. दरम्यान, या आंदोलनामध्ये शिवसेना त्याचबरोबर स्थानिक भाजपा नेत्यांनी सहभाग घेतला होता.