सांगली - हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे कडेगावचा मोहरम यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. गगनचुंबी ताबूत भेटी सोहळा यंदा रद्द करत साधेपणाने पारंपरिक धार्मिक विधी करण्यात आले. यावेळी कोरोनाचे संकट दूर कर, अशी प्रार्थना देवाकडे करण्यात आली.
हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मियांकडून ताबूतांची स्थापना करण्यात येते आणि मोहरमच्या दहाव्या दिवशी गगनचुंबी ताबूत भेटींचा सोहळा पार पडतो. सुमारे दीडशे वर्षांहून अधिक काळापासून ही परंपरा कडेगावमध्ये मोठ्या उत्साहात जोपासली जाते. मात्र यंदा कोरोना संकटामुळे या परंपरेत खंड पडला आहे आणि गगनचुंबी ताबूत भेटींचा सोहळा संपन्न होऊ शकला नाही, केवळ धार्मिक विधी आणि प्रतिकात्मक पद्धतीने याठिकाणी ताबूत भेटी पार पडल्या आहेत.
पारंपरिक पद्धतीने रविवारी मानाच्या सात भाई ताबूतसह बागवान, देशपांडे, शेटे, पाटील, अत्तार, इनामदार, तांबोळी, सुतार, माईनकर, मसूदमातासह आदी ताबूत व पंजे बारा इमामचे धार्मिक विधी पार करण्यात आले. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून प्रतिकात्मक भेटी सोहळा संपन्न झाला. या ठिकाणी मोहरम निमित्त 14 ताबूत बसवले जातात. त्यापैकी निम्मे ताबूत हिंदू बांधवांचे असतात.