सांगली - जत उपसा सिंचन योजनेतून ६५ गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावून दुष्काळी कलंक पुसणार असल्याचे वक्तव्य खासदार संजय पाटील यांनी केले. तर पाटील हे मतांसाठी पाण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप दुष्काळग्रस्तांनी केला आहे. येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
जतच्या अंकलगी येथे सर्वपक्षीय म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजनेच्या आराखडा संबंधी बैठकीचे आयोजन केले होते, यावेळी पाटील बोलत होते. दुष्काळी जत तालुक्यातील ६५ वंचित गावांना पाणी देण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजना तयार करण्यात आली आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अभियंता आणि अधिकाऱ्यांनी या नव्या योजनेचे प्रस्ताव स्लाईड शो द्वारे सादर केला. ६०० कोटींची या योजनेच्या माध्यमातून ३ टप्प्यातून जतच्या पूर्व भागातील पाण्यापासून वंचित ६५ गावांना पाणी पोहोचणार आहे. बंदीस्त पाईपलाईनद्वारे तालुक्यात पाणी पोहोचवले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तर दीड वर्षात ही योजना कार्यान्वित होऊन तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसून टाकू असा विश्वास कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांनी व्यक्त केला.
जत तालुक्याने सलग ३ वेळा भाजपचे आमदार आणि गेल्या वेळी खासदार म्हणून पाटील यांना निवडून दिले. पण तरीही अद्याप वंचित गावांना पाणी मिळाले नाही. तर गेल्या काही वर्षांपासून कर्नाटक राज्यातून पाणी देण्याची वेळोवेळी आश्वासन देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात राज्यकर्त्यांनी दुष्काळी भागाला पाण्याचा थेंबही दिला नाही. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मतांच्या राजकारणासाठी पाणी देण्याचा भावनिक मुद्दा पुढे करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका यावेळी विरोधकांनी केली.