सांगली - सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सेवेत असणाऱ्या बदली, मानधन आणि रोजंदारीवर कर्मचाऱ्यांचे गेल्या 5 महिन्यांपासून प्रॉव्हीडंट फंडाची रक्कम भरण्यात आली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत कामगार सभा संघटनेच्यावतीने प्रॉव्हीडंट फंडाची 1 कोटी 20 लाख रक्कम गेली कुठे? असा सवाल उपस्थित करत संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
सांगली महापालिकेचा प्रताप पालिकेने भरली नाही पीएफची रक्कम !सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेकडे बदली मानधन सुमारे आकराशे ते बाराशे कर्मचारी सेवेत आहेत. सेवेतील या कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हीडंट फंड (ईपीएस) हा गेल्या 5 महिन्यांपासून पालिकेकडून भरण्यात आला नसल्याचा प्रकार समोर आला आहे. महापालिका कामगार सभा या संघटनेकडून ही बाब समोर आणण्यात आली आहे. पालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांचे प्रायव्हेट फंडाची रक्कम पगारातून कपात करण्यात आली आहे. मात्र ती प्रॉव्हीडंट विभागाकडे भरण्यात आलेली नाही.
5 महिन्यांपासून रक्कम कपात -सप्टेंबर 2020 पासून प्रॉव्हीडंट फंडाची कपात ही कामगार कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातून 12% व महापालिकेचा हिस्सा 13.36% या प्रमाणे कपात केली जाते. कायद्यानुसार ती रक्कम प्रॉव्हीडंट फंड कचेरीकडे जमा करणेची तरतुद आहे. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून ही रक्कम जमा करण्यात आलेली नाही.
1 कोटी 20 लाख रक्कम भरली नाहीसाधरणता सप्टेंबर 2020 ते जानेवारी 2021 पर्यंत दर महिन्याला 11 लाख 51 हजार 753 रुपये कर्मचाऱ्यांची रक्कम आणि 12 लाख 81 हजार 598 इतका महापालिकेचा हिस्सा, अशी एकूण सर्वसाधारणपणे 1 कोटी 21 लाख रक्कम भरण्यात आली नाही. ही बाब कामगार संघटनेचे सचिव विजय तांबडे यांनी समोर आणली आहे.
प्रॉव्हीडंट फंड विभागाकडे तक्रार..याबाबत तांबडे यांनी पालिका प्रशासनाकडे याबाबत वारंवार विचारणाही केली. मात्र पालिकेकडून रक्कम लवकरच भरण्यात येईल, असे वारंवार सांगण्यात आले. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे तांबडे यांनी या सर्व प्रकाराबाबत प्रॉव्हीडंट फंड कोल्हापूर विभागीय अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली. यावर विभागीय आयुक्तांनी महापालिकेवर कायदेशीर कार्यवाही करुन व वरील रक्कम वसूल करुन, ती कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.